अनिकेतच्या आईकडून म्हापसा पोलिसांत तक्रार
म्हापसा : मरड म्हापसा येथील रिजीम प्लाझा कॉम्प्लेक्सच्या आवारातील खासगी पे पार्किंग कामगार आणि इतरांनी अनिकेत शिरोडकर व रूपसाई आरोंदेकर यांना चुकीच्या पद्धतीने बंदिस्त केले. त्यांना मारहाण व शिवागाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित अज्ञात ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी तक्रार म्हापसा पोलिसांत प्रविणा शिरोडकर यांनी दाखल केली आहे.
खासगी पे पार्किंगस्थळी दि. २७ रोजी घडलेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत शिरोडकर, रूपसाई आरोंदेकर, भुवन गोवेकर व साईश गोवेकर यांना अटक केली आहे.
फिर्यादी प्रविणा प्रवीण शिरोडकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, गणेश चतुर्थीच्या सजावटीवेळी थर्माकोलची कमतरता भासल्यामुळे थर्माकोल आणण्यासाठी मुलगा अनिकेत शिरोडकर व भाचा रूपसाई आरोंदेकर हे दोघे दुचाकीने म्हापशात आले होते.
मरड म्हापसा येथील रेईश कॉर्नर रेस्टॉरन्टसमोर पार्किंगवरुन तेथील दोघा पे पार्किंग शुल्क घेणाऱ्या कामगारांनी अनिकेत व रुपसाई यांच्याशी वाद घातला. तिथे अजून काही पे पार्किंग वसुली करणारे कामगार आणि इतर तिघे-चौघे आले. त्यांनी आपला मुलगा व भाच्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना चुकीच्या पद्धतीने पकडून बंदिस्त करून ठेवले. शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. संशयिताच्या तावडीतून भाचा रुपसाई याने सुटून जवळील भाजी मार्केटमध्ये धाव घेत आपली सुटका करून घेतली.
अनिकेत याने १०० व ११२ क्रमांकावर संपर्क साधला असता त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने आपला चुलत भाऊ भुवन गोवेकरला फोन करीत घटनेची माहिती दिली असता भुवन व त्याचा भाऊ साईश शिरोडकर हे दोघे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांना अनिकेतला सोडण्याची विनंती केली, मात्र संशयितांनीच भुवन व साईशवर हल्ला केला. या हाणामारीत दोघे पे पार्किंगवाल्यांना जखम झाली.
याप्रकरणी संशयितांविरुद्ध भा.न्या.सं.च्या १८९(२), १९१(२), १२६(२), ११५(२), ३९४(२), ३५१(३), ३५२, १२७(२), १३३ व १९० कलमान्वये गुन्हा नोंद करुन याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे शिरोडकर यांनी म्हापसा पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
मारहाणीचा प्रकार सीसीटिव्हीत बंदिस्त
मारहाणीचा एकंदरीत प्रकार तेथील सीसीटिव्ही कॅमेरामध्ये बंदिस्त झाला आहे. यावेळी आपला भाचा रुपसाई याची सोनसाखळीची देखील संशयितांनी चोरी केली आहे, असा दावा फिर्यादी गोवेकर यांनी केला आहे.