हिंदीत सुकून म्हणतात वा कोंकणीत थाकाय म्हणतात ते समाधान लतांच्या आवाजात अवघ्या ५ मिनिटांचं गाणं ऐकल्यावर मिळतं. कुठल्याही क्षणाला जगात कुठं तरी लताचं गाणं वाजत असतं, एक सुरीली नशा रसिकांना देत असतं.
आकाशवाणीवरून आजतागायत लता मंगेशकर यांनी गायलेली किती गाणी कितीदा प्रसारित केली गेली हा आकडा आकाशातील नक्षत्रांइतका असेल. आणि अजूनही लता दीदी हा आकाशवाणीचा एक महाकाय ऐवज आहे. लताशिवाय मनोरंजन वा विविध भारती ही कल्पनाच करू शकत नाही. लता दीदींच्या आवाजात ही मोहक जादू आहे. नजाकत आहे. कोट्यवधी लोकांना लता दीदींच्या विविध भाव-रसपूर्ण गाण्यांनी आनंद दिला. लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधीकधी कोणाच्या डोळ्यात पाणी येते, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांना आधार मिळतो. लतादीदी सर्व वयोगटांतील रसिकांना आवडते. दृष्टीहीनांना रेडिओ ऐकताना दीदींचा आवाज आशा देतो. कैद्यांना एक आशेचा किरण देतो. वृध्दांना स्मरणरंजनात्मक आठवणी वर आणून आनंद देतो.
लता मंगेशकर यांची काही टॉप सदाबहार गाणी बघूया ज्यामुळे त्यांच्या अलौकीक अद्वितीय कंठानिशी त्यांना भारताची कोकिळा बनवले.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी ८ दशके आपल्या सुरेल आवाजाच्या जादूने सर्वांना मंत्रमुग्ध केले. जगभरातील कोट्यवधी लोकांचे प्रेम त्यांनी मिळवले. त्यांच्या आवाजात अशी किमया आहे की जो कोणी त्यांची गाणी ऐकतो तो त्यात हरवून जातो.
ये मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी हे त्यांचं गीत गाजलं. त्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. देशभक्तीपर रस या गाण्यात आहे. आर्तता आहे. वंदे मातरम हे गाणंही असंच उत्तम आहे. लग जा गले, प्यार किया तो डरना क्या, आप की नजरों ने समझा, यह जिंदगी उसी की है, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं, आज फिर जाने की तमन्ना है.... अंत नाही याला. तुमच्या आवडीची गाणी या लिस्टमध्ये भरा.
कारण त्यांच्या आवाजात एक अद्वितीय खुबी आहे जी सीमांच्या पल्याड जाते आणि दक्षिण आशियातील लोकांना एकाच आवाजात एकत्र करते.
आकाशवाणीच्या सेवेत तीन दशके काम करताना मला दिवसातून काही मिनिटे लतादीदींची सुंदर गाणी ऐकावीच लागत. कारण ते प्रसारण एफएम वा विविध भारतीवरून चालू असे. बातम्या वाचायला स्टुडिओत गेलो तर कधी लतांचं गाणं चालू असे. पाकीजातील चलते चलते, हे माझ्या आवडीचं गाणं एकदा चालू होतं. मी त्यात हरवून गेलो. अकस्मात गाणं संपल्यावर निवेदकाने सात वाजून वीस मिनिटं झाली आहेत, आता ऐकूया प्रादेशिक बातम्या अशी घोषणा दिली. मी त्या स्वरात आणि ठेक्यात मुग्ध झालो होतो. दोन सेकंद गेले स्थिरस्थावर होण्यासाठी. नंतर वृत्तनिवेदन सुरू केलं.
'नूरी' चित्रपटातील 'चोरी चोरी कोई आये..' या गाण्यात हृदयातून निघणारा आवाज, 'पाकीजा' चित्रपटातील 'चलते चलते में...' या गाण्यात किंवा 'अन्नदाता' चित्रपटातील 'रातों के साये घने' या गाण्यात एक विलक्षण आवाज आणि 'चोरी चोरी' चित्रपटातील 'रसिक बलमा... दिल क्यूं लगाया तोसे...' या गाण्यात मनावर खोलवर परिणाम साधणारा उच्च सप्तक अंगांग भेदून जातो. त्यांची ताकद व हुकुमत ती ही.
अनेक मधुर गाण्यांमध्ये, लतादीदींनी गरजेनुसार तिच्या नैसर्गिक किंवा शुद्ध, बदललेल्या किंवा मऊ किंवा अगदी तीक्ष्ण तानचा वापर खूप चांगल्या प्रकारे केला आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या धड्यांशी परिचित असल्याचा हा परिणाम आहे.
पार्श्वगायिका लता दीदींच्या गाण्यांची संख्या खूप मोठी आहे. हिंदी धरून इतर भाषातील गाणीही त्यांनी गायली. हिंदीत सुकून म्हणतात वा कोंकणीत थाकाय म्हणतात ते समाधान लतांच्या आवाजात अवघ्या ५ मिनिटांचं गाणं ऐकल्यावर मिळतं. कुठल्याही क्षणाला जगात कुठं तरी लताचं गाणं वाजत असतं, एक सुरीली नशा रसिकांना देत असतं. या महान गायिकेची गाणी आकाशवाणीने माझ्या ओंजळीत भरली, पोटभर त्याचं सेवन केलं. दीदींना अभिवादन.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)