एकूण १३८ म्हणी आणि त्यामागील गोष्टी या संग्रहात दिसतात. म्हण, त्या म्हणीची गोष्ट आणि त्याच्या वापराचे संकेत असे सर्वसाधारणपणे बोरकर यांच्या पुस्तकातील एककांचे स्वरूप आहे.
‘जिबेवयली जतनाय’ हे सखाराम शेणवी बोरकर यांचे कोंकणी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ‘म्हणी फाटल्यो काणयो’ म्हणजे म्हणींमागच्या गोष्टी असे या पुस्तकाच्या शीर्षकाला उपशीर्षक आहे.
भाषेच्या संप्रेषणाला लालित्य आणण्यासाठी आणि तिला अधिक अर्थप्रवाही बनविण्यासाठी म्हणी विशेष ठरतात. लोकजीवनातील अनुभवसिद्ध शहाणपणातून या म्हणी निर्माण झालेल्या असतात. वरपांगी अनेक म्हणी विनोदी वाटल्या तरी त्यात मार्मिक अर्थ दडलेला असतो. जीवनव्यवहाराचे शहाणपण त्यात असते. पानभर मजकुराने होईल ते काम एखाद्या सुटसुटीत म्हणीतून संप्रेषित होऊ शकते, अर्थात ‘कानसेन’ शहाणीवेचा असला तर.
म्हणी कशा घडल्या असाव्यात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून दिसतो. बोरकर गेली अनेक वर्षे कोंकणी म्हणींचा संग्रह करीत आहेत, असे ते प्रस्तावनेत सांगतात. हजारो म्हणी त्यांनी संग्रहित केल्या आहेत. भाषेबद्दलच्या जिव्हाळ्यातून त्यांनी हे काम केले आहे. म्हणीच्या बाबतीत झालेल्या कोंकणी भाषेतील कामाचे काही संदर्भही त्यांच्या प्रस्तावनेत दिसतात.
एकूण १३८ म्हणी आणि त्यामागील गोष्टी या संग्रहात दिसतात. म्हण, त्या म्हणीची गोष्ट आणि त्याच्या वापराचे संकेत असे सर्वसाधारणपणे बोरकर यांच्या पुस्तकातील एककांचे स्वरूप आहे. पाच-सात ओळींपासून ते दोन-अडीच पानांपर्यंत प्रकरणे यांत आढळतात. ’लोक’ काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या गोष्टींचा संदर्भ आहे. प्राणी, नातेसंबंध, जाती, धर्म, व्यवसाय, लोकजीवन-लोकव्यवहार अशा संदर्भांतून या गोष्टी आणि पर्यायाने म्हणी उलगडतात. ’म्हाळ पै’ या व्यक्तीच्या संदर्भातून निर्माण झालेल्या म्हणी सुद्धा पुस्तकात आहेत. बहुतेक प्रकरणे ‘टू द पॉइंट’ असली तरी काही प्रकरणांत या म्हणींविषयी अन्य संदर्भ (संबंधित तसेच इतर प्रांतातील म्हणी, म्हणींचे भेद, सदृश गोष्टी वगैरे) दिलेले आहेत.
या म्हणींची ‘मांडावळ’ ही अकारविल्हे केलेली आहे. एक रसिक वाचक म्हणून पुस्तकात जास्त वाचनीय मजकूर शेवटी गेल्याचे जाणवते. या पुस्तकातील प्रकरणांची मांडणी वाचनीयतेनुसार करून शेवटी अकारविल्हे निर्देशसूची देता आली असती. एक निबंध स्वरूपाची नोंदही यांत आढळते, ज्यात लेखक कुणाशी तरी बोलता-बोलता म्हण शोधतो. मात्र पुस्तकातील म्हणींच्या गोष्टींचे संदर्भ दिलेले नाहीत. कदाचित बोरकर यांना त्या चौकस वार्तालापातून वा मौखिक चौकशीतून सापडल्या असाव्यात. प्रस्तावनेतही काही म्हणींविषयी पुस्तकांचे उल्लेख केलेले आहेत.
मी हे पुस्तक पाठचिकित्सेच्या दृष्टीने न वाचता सरळ वाचले. ते मला रंजक तसेच बोधक वाटले. काही गोष्टी वाचताना अशाच आकृतिबंधाच्या गोष्टी अन्यत्र वाचल्या किंवा ऐकल्यासारखे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तरीही पुस्तक वाचनीय झाले आहे. एक लक्षणीय बाब म्हणजे या पुस्तकात कोंकणीतील अनेक पोर्तुगीज मूळ असलेल्या लयदार शब्दांची पखरण आहे. यांतील काही शब्द हे म्हणींचा भाग म्हणूनही आलेले दिसतात. मुखपृष्ठही बोलके आणि आशयाशी सुसंगत झाले आहे.
सखाराम शेणवी बोरकर यांचे ‘जिबेवयली जतनाय’ हे पुस्तक भाषा-अभ्यासकांना अधिक शोधासाठी स्रोत उपलब्ध करून देणारे, तसेच भाषेच्या चोखंदळ वापरकर्त्यांना पौष्टिक पुरवणी ठरणारे आहे. भाषेच्या विकासासाठी असे दस्तावेजीकरणाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.
समीर झांट्ये