चोराचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद
म्हापसा : येथील वामन सदन इमारतीमधील सेलटाऊन रबर स्टॅम्प दुकान अज्ञात चोराने आज सकाळी फोडले. फ्लॅश मशीन, लॅमिनेशन मशीन व इतर साहित्य मिळून तब्बल २ लाखांचा माल चोराने लंपास केला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
म्हापसा येथील सूरज बुक स्टॉलच्या शेजारी असलेले हे दुकान रविवारी ३१ रोजी सकाळी ९.२० च्या सुमारास फोडण्यात आले. अज्ञात चोराने दुकानाच्या दरवाजावरील कुलूप दगड घालून तोडले आणि आत प्रवेश केला. आतील फ्लॅश मशीन, लॅमिनेशन मशीन, कॉम्प्युटरचा मॉनिटर, सील मशीन व स्टेबलायझर या वस्तू चोरून नेल्या. हा चोरीचा प्रकार दुकाना बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.
सकाळी १० च्या सुमारास घरातून खाली आल्यावर दुकानाचे मालक अंकुश वेर्णेकर यांच्या हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला. लगेच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, या प्रकरणी चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.