गोव्यात रेशनचा मोठा वाटा बाहेरील राज्यांच्या नागरिकांचा

बिहार, उत्तर प्रदेशचे सर्वाधिक : ‘वन नेशन, वन रेशन’अंतर्गत २३०० राज्याबाहेरील नागरिक घेत आहेत लाभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 hours ago
गोव्यात रेशनचा मोठा वाटा बाहेरील राज्यांच्या नागरिकांचा

समीप नार्वेकर
पणजी : गोव्यात ‘वन नेशन, वन रेशन’ योजनेअंतर्गत दर महिन्याला सुमारे २३०० नागरिक इतर राज्यांतील रेशन कार्ड वापरून गोव्यातून रेशन घेत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार येथील लाभार्थींचा सर्वाधिक वाटा आहे, अशी माहिती नागरी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गोव्यात कामानिमित्त किंवा वास्तव्यास असलेल्या नागरिकांपैकी अनेकजण स्थानिक रेशन कार्ड नसतानाही केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन रेशन’ योजनेअंतर्गत आपापल्या राज्यातील रेशन कार्डाचा वापर करून रेशन घेत आहेत.
या योजनेचा लाभ फक्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (एनएफएसए) येणाऱ्या एएवाय आणि पीएचएच कार्डधारकांनाच मिळतो. या योजनेसाठी स्वतंत्र नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थी आपले मूळ राज्यातील रेशन कार्ड गोव्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात सादर करून रेशन घेऊ शकतात.
गोव्यात सध्या सुमारे २३०० इतर राज्यांतील रेशन कार्डधारक 'वन नेशन, वन रेशन' योजनेअंतर्गत रेशन घेत आहेत. एकूण आठ राज्यांतील नागरिक गोव्यातून रेशन घेत असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ८७१ बिहारचे आणि ९२६ उत्तर प्रदेशचे नागरिक आहेत.
कर्नाटक राज्य ३०८ लाभार्थ्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, मध्य प्रदेशचे ९२, महाराष्ट्राचे ९१, राजस्थानचे २४, हरयाणाचे १२, आणि आंध्र प्रदेशचे ५ नागरिक गोव्यातून या योजनेचा लाभ घेत आहेत, अशी माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच, 'वन नेशन, वन रेशन' योजनेखाली इतर राज्यांतील एएवाय कार्डधारकांना गोव्याच्या मुख्यमंत्री मोफत एलपीजी योजनेसारख्या स्थानिक योजनांचा लाभ मिळत नाही, हे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन्ही जिल्ह्यांतील विविध राज्यांचे लाभार्थी
राज्य - उ. गोवा - द. गोवा

उत्तर प्रदेश  ३९५  ५३१

बिहार  ४७२ -  ३९९

कर्नाटक  १६७ १४१

मध्य प्रदेश २४  ६८

महाराष्ट्र - ३८ - ५३

राजस्थान - १२ - १२

आंध्र प्रदेश - १ - ४

एकूण  १,११३  १,२१६