गोव्यातील ३०८ गावे ‘ओडीएफ प्लस आदर्श गाव’ घोषित

५ गावे ओडीएफ दर्जा राखण्यात ठरली अपयशी : स्वच्छ भारत मिशनचा अहवाल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 hours ago
गोव्यातील ३०८ गावे ‘ओडीएफ प्लस आदर्श गाव’ घोषित

पणजी : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या अहवालानुसार, गोवा राज्य पूर्णपणे 'उघड्यावर शौचास मुक्त' (ओडीएफ) घोषित करण्यात आले आहे. राज्यातील ३७३ गावांपैकी ३६८ गावांनी आपला ओडीएफ दर्जा यशस्वीरीत्या राखला आहे. विशेष म्हणजे, यापैकी ३०८ गावांनी शौचालयाच्या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया सुरू केल्यामुळे त्यांना ‘ओडीएफ प्लस आदर्श गावा’चा सर्वोच्च दर्जा प्राप्त झाला आहे.
ओडीएफ दर्जा टिकवून ठेवणाऱ्या गावांचे वर्गीकरण पुढील तीन श्रेणींमध्ये केले जाते.
ओडीएफ प्लस आकांक्षा : या श्रेणीतील गावांनी ओडीएफ दर्जा कायम ठेवला असून, ते घनकचरा व्यवस्थापन करत आहेत. गोव्यातील ५८ गावांना हा दर्जा मिळाला आहे.
ओडीएफ प्लस उदयोन्मुख : ओडीएफ दर्जा राखण्यासोबतच घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या गावांना ही श्रेणी दिली जाते. गोव्यातील २ गावांनी ही स्थिती प्राप्त केली आहे.
ओडीएफ प्लस आदर्श : ही सर्वोच्च श्रेणी आहे. यात गावांनी स्वच्छता राखली असून, सार्वजनिक ठिकाणी घाणेरडे पाणी आणि प्लास्टिक कचरा जमा होण्यापासून रोखले आहे. तसेच, ओडीएफ प्लसबद्दल जनजागृती केली आहे. गोव्यातील तब्बल ३०८ गावांनी हा आदर्श दर्जा मिळवला आहे.
या अहवालानुसार, गोव्यातील पाच गावे ओडीएफ दर्जा राखण्यात अपयशी ठरली आहेत, तर ३६८ गावांनी तो कायम ठेवला आहे. ही राज्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे.
राज्यातील गावांची स्थिती
मानांकन व गावांची संख्या
ओडीएफ प्लस आदर्श : ३०८
ओडीएफ प्लस उदयोन्मुख : २
ओडीएफ प्लस आकांक्षा : ५८
ओडीएफ टिकवलेली एकूण गावे : ३६८
ओडीएफ टिकवण्यात अपयशी गावे : ५