खोट्या नंबरवर कॉल केल्यास होईल खाते रिकामे; अधिकृत वेबसाईटवरूनच हेल्पलाईन तपासा
पणजी : बँक, कंपनी किंवा कोणत्याही सेवेशी संबंधित कस्टमर केअर नंबर गूगलवर शोधताना लोक फसवणुकीचे बळी ठरत आहेत. कारण गूगलवर दिसणारे सर्व नंबर अधिकृत असतीलच असे नाही. अनेकदा सायबर गुन्हेगार खोटे (फेक) नंबर टाकून ग्राहकांची फसवणूक करतात आणि त्यांच्या बँक खात्यातील रक्कम लांबवतात.
सायबर तज्ज्ञांच्या मते, फसवे कस्टमर केअर प्रतिनिधी कॉल करणाऱ्यांना खोट्या वेबसाईट्स किंवा अॅप्सचे लिंक पाठवतात, जिथे लॉगिन केल्यावर तुमची माहिती थेट स्कॅमर्सकडे जाते. काही गुन्हेगार स्वतःला बँक अधिकारी म्हणून ओळख करून देत OTP, खाते क्रमांक, पिन, आधार माहिती मागतात. तर काही जण AnyDesk, TeamViewer सारखी रिमोट अॅक्सेस अॅप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडून मोबाईल किंवा संगणक हॅक करतात. कॉलवर तातडीचा दबाव टाकून लोकांना घाईघाईत संवेदनशील माहिती द्यायला भाग पाडले जाते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही कंपनीचा खरा कस्टमर केअर नंबर नेहमी त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अॅपमध्ये उपलब्ध असतो. प्रॉडक्टच्या बॉक्स, बिल किंवा युजर मॅन्युअलमध्ये दिलेले नंबरही अधिकृत मानले जातात. काही कंपन्या आपल्या अधिकृत फेसबुक, एक्स (ट्विटर) किंवा लिंक्डइन प्रोफाइलवरदेखील योग्य हेल्पलाइन नंबर जाहीर करतात.
ग्राहकांना सूचना आहे की, कधीही OTP, डेबिट/क्रेडिट कार्डचा पिन, नेटबँकिंगचा पासवर्ड किंवा मोबाईल स्क्रीनशेअर करू नये. कोणत्याही अनोळखी अॅपची लिंक डाउनलोड करू नये. ट्रूकॉलरवर नंबरला व्हेरिफाईड बॅज असला तरी तो 100% अधिकृत असेलच असे नाही, त्यामुळे अधिकृत स्त्रोतावरूनच नंबर तपासणे आवश्यक आहे. जर एखादा ग्राहक फेक कस्टमर केअर स्कॅमचा बळी ठरला, तर त्वरित जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार द्यावी. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हा रिपोर्टिंग पोर्टल (www.cybercrime.gov.in) वर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. खातेतील पैसे कापले असतील, तर लगेच बँकेशी संपर्क साधावा आणि संबंधित कंपनीलाही या फसवणुकीबाबत माहिती द्यावी.