फलोत्पादन मंडळाच्या सवलतीच्या दरातील नारळ विक्रीला विक्रमी प्रतिसाद

चतुर्थीच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा; चौथा टप्पा पूर्ण, पुढील नियोजनावर विचार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
फलोत्पादन मंडळाच्या सवलतीच्या दरातील नारळ विक्रीला विक्रमी प्रतिसाद

पणजी : राज्यात यंदा नारळ उत्पादनात घट झाल्याने बाजारभाव तब्बल ६० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचले. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी आणि ऐन चतुर्थीच्या तोंडावर फलोत्पादन मंडळाने सवलतीच्या दरात नारळ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला.

या उपक्रमासाठी कर्नाटकमधून नारळ आयात करण्यात आले. या उपक्रमाला ग्राहकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाल्याचे मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी सांगितले. गेल्या काही आठवड्यांत मंडळाने ७५ हजार नारळांची विक्री केली. त्यानंतर चतुर्थीच्या दोन दिवस आधी आणलेले २५ हजार नारळही अल्पावधीतच विकले गेले. मंडळाच्या गाळ्यांमधून नारळ ४३ ते ४५ रुपयांत विक्री करण्यात आले. नारळ ३८ किंवा ४० रुपयांना आयात करून त्यावरून गाळाधारकांना थेट ५ रुपयांचा नफा मिळाला. ग्राहकांनाही बाजारभावाच्या तुलनेत दिलासा मिळाला.

सध्या या उपक्रमाचा चौथा टप्पा पूर्ण झाला असून या आठवड्यात मंडळ त्याचा आढावा घेणार आहे. पुढे हा उपक्रम सुरू ठेवायचा की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.