बाप्पाच्या आगमनाचा गजर, दोघा मंत्र्यांना खात्यांचे वाटप
पणजी : ढोलताशांच्या गजरात गणरायाचे भक्तीपूर्ण वातावरणात आगमन झाले. बाप्पाच्या स्वागताला पावसाने हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी दीड दिवसांच्या गणेशाला निरोप देण्यात आला. एकंदरित हा आठवडा गणेशमय असून वीज घोटाळ्यातून मॉविन गुदिन्हो यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दिगंबर कामत यांना पीडब्ल्यूडी खाते तसेच इतरांनाही खाती वाटप करण्यात असून या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
उगवे येथे स्वयंअपघातात दुचाकीस्वार पशुवैद्याचा मृत्यू
उगवे पेडणे येथील श्री माऊली मंदिराजवळ बुलेटच्या (क्र. जीए ११ एल ०२८५) झालेल्या स्वयंअपघातात गुडे शिवोली येथील डॉ. श्रद्धेश सुदेश नार्वेकर (२९) यांचा मृत्यू झाला. पेडणे येथील पशुवैद्यकीय कार्यालयात ते सेवा बजावत होते. बुलेटवर त्यांच्या मागे बसलेला आतेभाऊ विशाल गोरक्षनाथ मोटे (३२, तोरसे) गंभीर जखमी झाला.
सिकेरीत चर्चला आग लागून ८० लाखांचे नुकसान
सिकेरी येथील आग्वाद किल्लास्थळी असलेल्या सेंट लॉरेन्स चर्चला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत धर्मगुरुंच्या निवासी खोल्यांसह गोदाम खोलीतील पुरातून वस्तू आणि छताचे लाकूड जळाल्याने सुमारे ८० लाख रुपयांची हानी झाली. हे चर्च ३०० वर्षांपूर्वीचे आहे.
राज्यात एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू
राज्यात रविवारी पाच जणांचे मृतदेह सापडले. आमोणे पुलाखाली सापडलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. जुने गोवे परिसरात दोन, तर पणजी फेरी धक्क्याजवळ नदीत एकाचा मृतदेह सापडला. फोंडा येथे सकाळी मॉर्निंग वॉकवेळी कोसळून एकाचा मृत्यू झाला.
स्वीगी डिलिव्हरी बॉयला ड्रग्जसह अटक
उसापनगर सांकवाळ येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने राहुल उप्पालदीन्नी (३३, जुने वाडे सांकवाळ) या स्वीगी डिलिव्हरी बॉयला गांजासह अटक केली. संशयित आरोपी हा स्वीगी डिलिव्हरीच्या नावाखाली सांकवाळ व वास्को परिसरातील युवावर्गाला ड्रग्जचा पुरवठा करीत होता.
सोमवार
वीज घोटाळ्यातून मॉविन गुदिन्हो यांची निर्दोष मुक्तता
गोव्यात २७ वर्षांपूर्वी नोंद झालेल्या ४.५२ कोटींच्या वीज घोटाळा प्रकरणात वाहतूकमंत्री आणि तत्कालीन वीजमंत्री मॉविन गुदिन्हो यांची निर्दोष सुटका झाली. खटल्यातील अन्य आरोपी टी. नागराजन, विठ्ठल भंडारी, आर. के. राधाकृष्णन, के. व्ही. एस. कृष्णकुमार यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. उत्तर गोवा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी सोमवारी दुपारी हा निकाल जाहीर केला. या खटल्यात राज्य सरकार फिर्यादी पक्ष होता.
कळंगुटमधील चार क्लबवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा नोंद
मेसर्स नोवेक्स कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीचे हक्क असलेली गाणी परवानगीशिवाय वाजवल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांनी चार क्लबचे मालक व व्यवस्थापक यांच्याविरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बॅनर लावण्यावरून रुमडामळ परिसरात तणाव
रुमडामळ परिसरात आमदार उल्हास तुयेकर यांचा बॅनर लावल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. पंच विनायक वळवईकर यांनी आमदार विकासकामे करत नसल्याने बॅनर लावण्याला विरोध दर्शविला.
मडगावात युवकाला बंदूक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न
मडगाव येथील होली स्पिरिट चर्चनजीक एका युवकाला बंदूक दाखवून धमकावण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पर सुरावली येथील विनय आरोंदे या युवकाने याबाबत फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.
मंगळवार
गोवा शिपयार्डजवळ बार्ज बुडाली
खनिज धातूच्या प्लेट घेऊन मुरगाव बंदराकडे येणारी बार्ज येथील गोवा शिपयार्डजवळ अपघातग्रस्त होऊन समुद्रात कलंडली. त्यानंतर त्या बार्जवरील आठ जणांना सुखरूपपणे वाचविण्यात आले.
अवैध वास्तव्य प्रकरणी ब्रिटिश नागरिकाला अटक
वैध व्हिसाविना राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली निआल्ल ज्यूलियन राईस (४२) या ब्रिटिश नागरिकाला हणजूण पोलिसांनी अटक केली.
बुधवार
दिगंबर कामत यांना पीडब्ल्यूडी खाते
पाणी पुरवठा वगळून दिगंबर कामत यांना सार्वजनिक बांधकाम खाते, रमेश तवडकर यांना क्रीडा, आदिवासी कल्याण सुभाष फळदेसाई यांना पाणी पुरवठा खाते, वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून गृहनिर्माण खाते काढून त्या बदल्यात त्यांना संग्रहालय आणि राजपत्र ही खाती दिली आहेत.
मुसळधार पावसात गणरायाचे आगमन
राज्यात बुधवारी सर्वत्र गणरायाचे आगमन झाले. बाप्पाच्या स्वागताला पावसानेही जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने बुधवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता, दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या. यंदा हंगामी पावसाने १०२.७२ इंच नोंदवत शतक पूर्ण केले आहे.
गुरुवार
दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
राज्यात गुरुवारी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात भाविकांनी बाप्पांना निरोप दिला. हवामान खात्याने गुरुवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असला, तरी राज्यात किरकोळ पावसाची नोंद झाल्याने विसर्जन विधीत कोणताही अडथळा आला नाही.
म्हापशात कामगारांवर सुरी हल्ला; पाचपैकी चौघांना अटक
दुचाकी व्यवस्थित पार्क करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात, पे-पार्किंगमधील दोन कामगारांवर पाच जणांच्या टोळक्याने जीवघेणा सुरीहल्ला केला. गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी म्हापशात घडलेल्या या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली असून, एकाचा शोध सुरू आहे.
शुक्रवार
वास्कोत धोकादायक इमारतीच्या दोन बाल्कनी कोसळल्या
वास्को शहर भागातील अंतर्गत रस्त्याकडेला असलेल्या ‘हॅप्पी अपार्टमेंट’च्या दोन बाल्कनी शुक्रवारी सकाळी कोसळल्या. सुदैवाने रस्त्यावर वाहने, पादचारी नसल्याने मोठी आपत्ती टळली. मात्र एका स्कूटरचे नुकसान झाले.
विजेच्या झटक्याने भावांचा मृत्यू प्रकरणी एका महिलेला अटक
शिवसुरे रिवण येथे गणेश चतुर्थीच्या दिवशी दोघा सख्ख्या भावांचा शेतात टाकलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी केपे पोलिसांनी शिवसुरे येथील जया बापू गावकर (६४) या महिलेला अटक केली आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम
राज्यात गुरुवारी दिवसभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती; मात्र रात्रीतच पावसाचा जोर पुन्हा वाढला. शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाची नोंद झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्या.
शनिवार
मंत्री मॉविन गुदिन्हो यांची निर्दोष मुक्तता
वीज सवलत घोटाळा प्रकरणात मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यासह इतर सर्व संशयितांची नुकतीच पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उत्तर गोवा विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशात एकंदरीत तपास प्रक्रियेवरच तीव्र टीका करत तपास अधिकारी संबंधितांवर फौजदारी गुन्हा किंवा भ्रष्टाचार सिद्ध करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे म्हटले आहे.
पडिक घराची भिंत कोसळून शेजारील घराचे नुकसान
गावसावाडा म्हापसा येथील एका पडिक घराची भिंत कोसळून शेजारील प्रसाद केरकर यांच्या घराचे नुकसान झाले. केरकर यांच्या घराशेजारी विनावापर अवस्थेत असलेल्या जुन्या घराची भिंत त्यांच्या घराच्या दर्शनी भागावर पडली. या दुर्घटनेत केरकर यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले.
कचरावाहू गाडी उलटून दोन कामगार जखमी
वार्का पंचायत क्षेत्रातील कचरा संकलनासाठी जाणारा टेम्पो रावणफोंड–नावेली रस्त्यावर उलटल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मडगाव येथील ईएसआय इस्पितळात उपचार सुरू आहेत.
लक्षवेधी
राज्यात सर्वत्र गणेश चतुर्थीचा सण आनंदात साजरा होत असताना, केपे तालुक्यातील शिड्डे-पांडवसडा (रिवण) येथे विजेचा धक्का लागल्याने राजेंद्र काशिनाथ गावकर व मोहनदास काशिनाथ गावकर या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वादग्रस्त मुख्याध्यापक देविदास कोटकर यांची अखेर बदली करण्यात आली. सावर्डे हायस्कूलच्या मुख्याध्यापक सारीका नाईक यांच्याकडे नगरगाव हायस्कूलचा ताबा देण्यात आला. कोटकर यांची खांडोळा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्यपदी बदली करण्यात आली.
मरड-म्हापसा येथील रिजीम प्लाझा कॉम्पलेक्समधील खासगी पे पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या दोघा कामगारांवर सुरी हल्ला झाला. जखमीवर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर वाहन मालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
केरी सरपंच सुप्रिया गावस यांच्यावरील ९ पैकी ७ पंच सभासदांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंगळवारी सात ७ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला. सरपंच सुप्रिया गावस व पंच सभासद राजेश गावस यांची अनुपस्थिती होती.