पणजी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगे आणि धारबांदोडा केंद्रात पावसाचा आकडा दीडशतकाच्या जवळ पोहोचला आहे. १ जून ते ३० ऑगस्टदरम्यान सांगे येथे १४८.७० इंच तर धारबांदोडा येथे १४८.०५ इंच पाऊस नोंदवला गेला.
शनिवारी राज्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली, तरी किरकोळ पाऊस सुरूच होता. गेल्या २४ तासांत राज्याची सरासरी पर्जन्यमान १.८१ इंच राहिली. यामध्ये सांगेत २.८५ इंच, केपे येथे २.३६ इंच, तर पणजीत २.२३ इंच पाऊस झाला.
हवामान विभागाने ३१ ऑगस्ट रोजी दक्षिण गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच १ ते ५ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून या काळासाठीही यलो अलर्ट दिला आहे.
शनिवारी पणजीत कमाल तापमान २६.२ अंश, किमान २४.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मुरगावमध्ये कमाल २६.८ तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमान राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३०-३१ अंश आणि किमान तापमान २४-२५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. १ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राज्यात सरासरी ११२.८० इंच पावसाची नोंद झाली असून, यंदा पावसाचे प्रमाण ७.३ टक्क्यांनी अधिक आहे.
केंद्र / पाऊस (इंचात)
सांगे / १४८.७०
धारबांदोडा / १४८.०५
केपेमध्ये / १३८.९५
वाळपई / १३५.७८
फोंडा / १२०.६६
साखळी / ११५.९५
काणकोण / १०७.७२
जुने गोवे / १०६.७१
पेडणे / १०८.३९