झरमे, चरावणे येथील बीएसएनएल टॉवर निकामी

कोट्यवधी रुपये खर्चूनही नेटवर्कची समस्या कायम; ग्राहकांत नाराजी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 hours ago
झरमे, चरावणे येथील बीएसएनएल टॉवर निकामी

वाळपई : सत्तरी तालुक्यातील झरमे आणि चरावणे गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बीएसएनएलचे मोबाईल टॉवर गेल्या काही दिवसांपासून योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे स्थानिक ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः गणेश चतुर्थीच्या काळात वारंवार नेटवर्क गायब होत असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.गोव्याच्या ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क सुविधा पोहोचवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून, झरमे आणि चरावणे येथे दोन वर्षांपूर्वी मोबाईल टॉवर उभारणीला सुरुवात झाली होती. मात्र, कंत्राटदाराला वेळेवर बिल मिळत नसल्याने कामावर परिणाम झाला. गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही गावांमध्ये नेटवर्क सुरू झाले असले तरी, ते सातत्याने गायब होत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून नेटवर्कची ही समस्या अधिकच गंभीर झाली असून, सणासुदीच्या काळात नातेवाईकांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. या संदर्भात ग्राहकांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
स्थानिक आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी
कोट्यवधी रुपये खर्च करूनही मोबाईल नेटवर्कची समस्या कायम असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्थानिक आमदार डॉ. देविया राणे यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून तो सोडवावा, अशी मागणी केली आहे. ग्राहकांच्या मते, जर नेटवर्क व्यवस्थित काम करत नसेल तर टॉवर उभारणीचा मूळ उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे कंपनीने ही समस्या गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.