पणजी : गोव्यातील शाळांच्या वाचनालयांत दरवर्षी सरासरी एक लाखांहून अधिक पुस्तकांची भर पडत आहे. केंद्रीय शिक्षण खात्याच्या युडीआयएसई प्लस अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये राज्यातील शाळांमध्ये ३९ लाख ४६ हजार ६४५ पुस्तके होती. २०२४-२५ मध्ये ही संख्या वाढून ४४ लाख २५ हजार १९४ झाली. म्हणजेच दोन वर्षांत २.३८ लाख पुस्तके खरेदी करण्यात आली असून, सरासरी दरवर्षी १.१९ लाख पुस्तकांची भर पडली आहे.
सध्या राज्यातील १४७९ शाळांमध्ये वाचनालय किंवा बुक बँक आहे. एकूण पुस्तकांच्या संख्येनुसार प्रत्येक शाळेत सरासरी २,९९२ पुस्तके उपलब्ध आहेत. सरासरी पुस्तकांच्या बाबतीत गोवा देशात अव्वल आहे. केरळ (२,८३६ पुस्तके), हरियाणा (२,२४२), कर्नाटक (१,६३६) यानंतरचे क्रमांक आहेत. देशभरातील शाळांमध्ये एकूण १२१ कोटी पुस्तके असून, सरासरी प्रति शाळा ८२७ पुस्तके उपलब्ध आहेत.
केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड सर्वात पुढे असून, येथे सरासरी ९,९९० पुस्तके आहेत. दिल्ली (५,९३२) व पुद्दुचेरी (३,३४८) यांचा क्रमांक पुढे लागतो. देशात मेघालय सर्वात खालच्या क्रमांकावर असून, तेथे प्रति शाळा फक्त १२० पुस्तके आहेत.
डिजिटल वाचनालयांच्या बाबतीत मात्र गोव्याची स्थिती फारच मागे आहे. राज्यातील १४७९ शाळांपैकी केवळ ४१ शाळांत (२.७७ टक्के) डिजिटल वाचनालयाची सोय आहे. यात सरकारी १०, अनुदानित २३ आणि खाजगी ८ शाळांचा समावेश आहे. केरळमध्ये हे प्रमाण १९.५ टक्के आहे, तर मिझोरममध्ये फक्त ०.१ टक्के इतके कमी आहे.