पणजी : कॅनरा बँकेची तब्बल ७ कोटी रुपयांची फसवणूकीप्रकरणी नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली. पणजी येथील सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये दक्षिण गोव्यातील तब्बल २.८६ कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या मालमत्तांमध्ये २२ भूखंड, दोन जमिनीचे प्लॉट्स आणि एक आलिशान रो व्हिला यांचा समावेश आहे.
ही कारवाई क्राउन मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन व त्यांच्या भागीदारांविरुद्ध करण्यात आली आहे. सीबीआयच्या एफआयआर व आरोपपत्राच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. या भागीदारांनी कॅनरा बँकेकडून कच्च्या लोखंडाच्या (raw iron)व्यवसायाच्या नावाखाली ७ कोटी रुपयांचे ओपन कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. मात्र त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून आधीच इतर बँकांकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेची कागदपत्रे पुन्हा गहाण ठेऊन हे कर्ज उचलले असल्याचे स्पष्ट झाले.
कर्जाची रक्कम त्वरित खोट्या व्यवसाय व्यवहारांच्या माध्यमातून वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. या गुन्हेगारी मार्गाने मिळवलेल्या पैशांचा संबंधितांनी स्वतःच्या भोग विलासासाठी तसेच नवी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापर केला. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये भागीदार रियाज शेख यांच्या धारबांदोड्यातील २२ भूखंडांचा समावेश आहे, तर व्यवस्थापकीय भागीदार आदित्य आंगले यांच्या कुंकळ्ळीतील दोन जमिनीचे प्लॉट आणि फातोर्डातील आलिशान रो व्हिला तात्पुरता जप्त करण्यात आला आहे.
या फसवणूक प्रकरणातील एकूण काळा पैसा (प्रोसिड्स ऑफ क्राईम) ७ कोटी रुपये असल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले असून, त्यापैकी २.८६ कोटींची संपत्ती आत्तापर्यंत जप्त करण्यात आली आहे.