पणजी : खड्ड्यांवरील पॅच'वर्क'चा मुलामा पावसात धुऊन निघाला

रस्त्यांची अवस्था बनली अजून दयनीय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
पणजी : खड्ड्यांवरील पॅच'वर्क'चा मुलामा पावसात धुऊन निघाला

पणजी : गेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे राजधानी पणजी व अससपासच्या परिसरातील महत्त्वाचे रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. पणजी केटीसी, भाटले अंतर्गत भागांतील ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेले रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला नगरपालिकेने केलेल्या पॅच'वर्क'चा मुलामा देखील काही दिवसांतच धुऊन निघाल्याने वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पोन्टे दे लिन्हारेस (जुना पाटो ब्रिज) ते फोर पिलर्स चौकापर्यंत जाणारा रुआओरेंम हा रस्ता सर्वाधिक प्रभावित झाला आहे. गेल्या आठवड्यात केलेले डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गाने प्रवास करणे वाहनचालकांसाठी कठीण झाले आहे. शहरातील केटीसी बसस्थानक परिसरात तर काल दिवसभर गुडघाभर पाणी साचले होते. या भागातून वाट काढताना वाहनचलकांची तारांबळ उडाली. कांपाल भागातील नव्या फुटबॉल स्टेडियमजवळील निवासी वस्तीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे.

भाटले परिसरातील रस्त्यांवरही केलेले पॅचवर्क देखील धुऊन निघाले आहे. भाटले मशिदीपासून नजीकच असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपलपर्यंतच्या जवळपास एक किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत येथे केलेल्या सांडपाणी व्यवस्थेच्या कामानंतर हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. दरम्यान, शहरातील मुख्य असा १८ जून रस्ता मात्र मुसळधार पावसातही सुरक्षित राहिला. आल्तिन्हो डोंगरावरील पावसाचे पाणी मांडवी नदीकडे वळवण्यासाठी मान्सूनपूर्व कामे आणि नियोजनबद्ध पद्धतीने कलेली गटारींची सफाई यशस्वी ठरल्याचे दिसून आले. गतवर्षी या रस्त्यावर पावसाळ्यात वारंवार पाणी साचत असे. दरम्यान नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सध्याचे हवामानच रस्त्यांच्या दुरुस्तीच्या आड येत असल्याचे सांगितले. एखाद-दोन दिवस कोरडे हवामान मिळाले तर पुन्हा कामगारांना पाठवून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा