पणजी : केपे तालुक्यातील सडा-पांडवसडा (रिवण) येथे विजेच्या धक्क्याने दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक तपासानुसार, राजेंद्र काशिनाथ गावकर आणि मोहनदास काशिनाथ गावकर यांना एका शेतजमिनीच्या विजेच्या कुंपणाशी (इलेक्ट्रिक फेन्सिंग) संपर्क आल्याने शॉक बसला, असे स्पष्ट झाले आहे. वीज खात्याने या घटनेचा त्यांच्या वीज वाहिन्यांशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
राजेंद्र आणि मोहनदास गावकर हे दोघे भाऊ गुरांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात गेले होते. चतुर्थीच्या रात्री त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी आढळले. घटनेची माहिती मिळताच वीज खात्याच्या अभियंत्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी मृतदेह सापडले, त्या ठिकाणी वीज खात्याची कोणतीही वीज वाहिनी नव्हती. उलट, एका जमीन मालकाने आपल्या जमिनीभोवती जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक फेन्सिंग केले होते. या कुंपणाला स्पर्श झाल्यानेच दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेवर स्थानिक आमदार आणि समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील. यासाठी ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहेत.