गोव्यात पावसाचा जोर कायम ; पडझड सुरूच

प्रतिनिधी | गोवन वार्ता

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
29th August, 03:36 pm
गोव्यात पावसाचा जोर कायम ; पडझड सुरूच

पणजी : राज्यात गुरुवारी दिवसभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र रात्रीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला. शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाची नोंद झाली. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्या. राज्यातील विविध रस्त्यांवर पाणी साचले होते. सततच्या पावसाने वास्को येथील हॅप्पी अपार्टमेंट इमारतीच्या दोन बाल्कनी कोसळल्या . हवामान खात्याने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.



राजधानी पणजीत सकाळी जोरदार पावसाची नोंद झाली. दयानंद बांदोडकर रस्ता, कदंब बस स्थानक परिसर, पाटो, सांतिनेज परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने येथील वाहतूक खोळंबली होती. रस्त्यांवरील खड्ड्यांमधून वाहन चालवताना चालकांची चांगलीच दमछाक झाली. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या चोवीस तासात राज्यात सरासरी १.७४ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान मुरगावमध्ये २.७८ इंच, धारबांदोडामध्ये २.४६ इंच पाऊस पडला. राज्यात १ जून ते २९ ऑगस्ट दरम्यान राज्यात सरासरी ११०.८६ इंच पावसाची नोंद झाली आहे.



हवामान खात्याने ३० ऑगस्ट ते ४ स्पटेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या सहा दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी पणजीत कमाल २९.२ अंश तर किमान २४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुर गाव मधील कमाल तापमान २७.८ अंश व किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस राहीले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा