वास्को : दाबोळीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड

विमानतळावर अडकून पडल्याने सुमारे १७० प्रवाशांना सोसावा लागला नाहक मनस्ताप

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th August, 11:37 am
वास्को : दाबोळीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड

पणजी : गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला गुरुवारी रात्री तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. दाबोळी विमानतळावरून उड्डाण करणारे विमान (फ्लाईट 6E6360) बोर्डिंगनंतर रद्द करण्यात आले. रात्री १०.५५ वाजता सदर विमान मुंबईच्या दिशेने झेप घेणार होते. दरम्यान विमानाचा वायपर काम करत नसल्याने तांत्रिक समस्या उद्भवल्याचे कारण देऊन उड्डाण रद्द करावे लागले. सुमारे १७० प्रवासी विमानतळावर अडकून पडल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, गुरुवारी सकाळी सूरतदुबई इंडिगो विमानालाही हवेत तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. एअरबस A320-271N फ्लाईट 6E1507 या विमानाने सकाळी ९.४५ वाजता सूरत विमानतळावरून उड्डाण केले, मात्र उड्डाणानंतरच बिघाड निर्माण झाल्याने आपत्कालीन स्थितीत ते अहमदाबाद विमानतळावर उतरवण्यात आले. सकाळी ११.४० वाजता विमान सुरक्षित उतरले. विमानात १७० प्रवासी होते आणि सर्व सुखरूप आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांनी ही लँडिंग खबरदारीचा उपाय म्हणून झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान इंडिगोने लगेचच दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून प्रवाशांना दुबईला रवाना केले.

वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे पुन्हा एकदा विमान प्रवासातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. जुलै ते ऑगस्ट २०२५ या काळात देशात अशा अनेक घटना घडल्या आहेत. दिल्लीकोलकाता एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड उद्भवल्याने टेकऑफ थांबवावे लागले होते. तर दिल्लीहून इंफाळकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटला हवामानाचे कारण परत पाठवण्यात आले. पुणेदिल्ली एअर इंडिया फ्लाईटमध्ये खिडकीचं पॅनेल उखडल्याचा प्रकारदेखील ताजा आहे. याशिवाय अलायन्स एअरचे गुवाहाटीकोलकाता विमान तांत्रिक बिघाडामुळे मधेच इतरत्र वळवावे लागले होते.

या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विमान कंपन्या आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांनी सुरक्षा उपाय कडकपणे राबवणे आणि तपासण्या अधिक काटेकोरपणे पार पाडणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांकडून होत आहे.