जीवितहानी टळली : जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
वास्को :शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुनाट हॅप्पी अपार्टमेंट्स या इमारतीच्या दोन बाल्कनी अचानक कोसळल्याने शुक्रवारी परिसरात मोठी घबराट पसरली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र खाली उभ्या असलेल्या एका स्कूटरचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे पुन्हा एकदा वास्को शहरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दुपारी ही घटना घडताच अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पालिकेच्या ट्रकमधून कोसळलेल्या बाल्कनीचा ढिगारा आणि माती हटवण्याचे कामही तातडीने सुरू करण्यात आले.
स्थानिक आमदार कृष्णा (दाजी) साळकर आणि नगरसेवक शमी साळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी स्थानिक प्रशासनाला या घटनेसंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, या दुर्घटनेने शहरातील जुन्या इमारतींच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
धोकादायक इमारतींवर कठोर धोरण लागू करण्याची मागणी
या घटनेनंतर स्थानिक आमदार दाजी साळकर यांनी चिंता व्यक्त करत म्हटले की, वास्को आणि आसपासच्या परिसरातील धोकादायक व जुनाट इमारतींचे मालक अशा दुर्घटनांसाठी जबाबदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना तातडीने या प्रकरणात लक्ष घालून अशा धोकादायक इमारतींसाठी कठोर धोरण लागू करण्याची मागणी केली.