१५ दिवसांत प्रकल्प होणार कार्यान्वित
म्हापसा येथील मार्केट सब यार्डमध्ये उभारलेला केळी पिकवणारा ‘बनाना रॅपनिंग चेंबर’ प्रकल्प.
उमेश झर्मेकर
म्हापसा : रसायनाचा वापर करून केळी व इतर फळे कृत्रिमरीत्या पिकवली जात असल्याच्या मुद्द्यावरून म्हापसा मार्केट सब यार्ड हे नेहमीच चर्चेत असते. मार्केट सब यार्डवरील हा ठपका पुसून काढण्याच्या उद्देशाने सरकारने गोवा कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन मंडळातर्फे यार्डमध्ये वैज्ञानिक पद्धतीने केळी पिकवण्यासाठी बनाना रॅपनिंग चेंबरची उभारणी केली आहे. या युनिटमध्ये एकाचवेळी ६० टन केळी पिकवण्याची क्षमता आहे.
या चेंबरसाठी २ कोटी रुपये खर्च आला आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन योजनेच्या भागिदारीतून हा प्रकल्प उभारला असून प्रकल्पाचा ३३ टक्के खर्च योजनेतून मिळाला आहे. सब यार्डमध्ये सुमारे ३०० चौ.मी. जागेत हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामध्ये १५ टन क्षमतेचे चार रेफ्रिजरेशन सिस्टमचे चेंबर बसवले आहेत. यामध्ये प्रत्येकी १५ टन केळी पिकवली जाऊ शकतात. या चेंबरसह इथे केळी ठेवण्याचा विभाग आहे. यामध्ये एक कर्मचारी असेल. अशाच प्रकारचे युनिट फोंडा येथील मार्केट सब यार्डमध्ये आहे. त्याची ४० टन केळी पिकवण्याची क्षमता आहे.
अन्न व औषधे प्रशासनाच्या छापेमारीत म्हापसा सब यार्डमध्ये रसायन वापरून केळी पिकवल्याचे प्रकार उघडकीस आले होते. यावर तोडगा म्हणून सरकारने बनाना रॅपनिंग चेंबर प्रकल्प उभारण्यास प्राधान्य दिले आहे.
आंबे पिकवण्याचा प्रकल्पही विचाराधीन
म्हापसा मार्कट सब यार्डमध्ये दररोज १५ ते १६ टन केळींचा पुरवठा होता. मागणी जास्त असल्याने केळी लवकर पिकवण्यासाठी पुरवठादार विक्रेत्यांकडून रसायनाचा वापर केला जातो. हा शॉर्टकटचा प्रकार अवैध असून अशा प्रकारे पिकवलेली केळी आरोग्यास घातक असतात. यापुढे म्हापशात आंबे पिकवण्याचा प्रकल्पही उभारण्याचा सरकारचा विचार आहे.
म्हापसा मार्कट सब यार्डमध्ये उभारलेला बनाना रॅपनिंग चेंबर प्रकल्प १५ दिवसांत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला आहे. वीज जोडणी मिळाल्यावर चाचणीअंती हा प्रकल्प सेवेत येईल. हा ६० टन क्षमतेचा प्रकल्प असून प्रत्येकी १५ टन केळी दरदिवशी वैज्ञानिक पद्धतीने पिकवली जाणार आहेत.
- सत्यवान देसाई, सचिव, गोवा कृषी उत्पन्न आणि पशुधन विपणन मंडळ