मडगाव : श्रद्धा, संस्कृती आणि निसर्ग यांची सांगड घालत मडगाव शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या हेतूने निर्मळ निर्माल्य हा उपक्रम राबवला जात आहे. मॉडेल मडगाव टीमकडून विविध उपक्रम जाहीर करण्यात आले होते. त्यातील निर्मळ निर्माल्य हा उपक्रम पर्यावरणाला पूरक ठरत आहे.
मंत्री दिगंबर कामत यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज कामत यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाअंतर्गत तब्बल ७०० किलो निर्माल्याचे १५० किलो सेंद्रिय खतात रूपांतर करण्यात आले होते. यंदा या उपक्रमाचा विस्तार करण्यात आला असून, मडगावातील सात प्रमुख मंदिरांमधून वर्षभर निर्माल्य संकलन सुरू राहणार आहे. यात श्री दामोदर मंदिर (पिंपळकट्टा), श्री हरि मंदिर, श्री दामोदर लिंग (फातोर्डा), श्री मारुती मंदिर (पेड्डा), श्री दामोदर साळ, श्री राम मंदिर आणि श्री साईबाबा मंदिरांचा समावेश आहे.
झोनल कृषी विभाग व अल्टर एनर्जी झी टीमच्या सहकार्याने झोनल कृषी कार्यालय परिसरात एक स्वतंत्र कंपोस्टिंग युनिट उभारले आहे. येथे धार्मिक भावना जपत निर्माल्याचे शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केले जाते. देवाला वाहिलेली फुले, दूर्वा, पत्री, जानवी, अगरबत्ती, जोडवी, तांदूळ, ल्हायो (मुरमुरे), माटोळीतील साहित्य, सुपारी, पान, नारळाचे तुकडे इत्यादींना निर्माल्य मानले जाते. यासाठी मडगावात विविध ठिकाणी ३ सप्टेंबरपर्यंत विशेष निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत.
दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनानंतर, मडगाव परिसरातील कलशांतून तब्बल ४०० किलो निर्माल्य गोळा करण्यात आले. या सर्वावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून त्याचे खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. हा उपक्रम पर्यावरणस्नेही असून, त्याला मडगावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे योगीराज कामत यांनी सांगितले.