देशातील सरासरीपेक्षा कमी प्रमाण : आयकरदाते नसलेल्यांना केंद्राचे सह-योगदान
पणजी : राज्यात अटल पेन्शन योजनेअंतर्गत ३० जून २०२५ पर्यंत १ लाख ९ हजार २२१ खाती उघडण्यात आली होती. यातील १२.७५ टक्के म्हणजेच १३ हजार ९२३ जणांनी आपली खाती बंद केली आहेत. संपूर्ण देशात या योजनेतील खाती बंद होण्याचे प्रमाण १६.११ टक्के इतके होते. अर्थ खात्याने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार योजनेअंतर्गत व्यक्तीला नोंदणी अर्जावर बचत बँक खात्याचे तपशील, वैयक्तिक तपशील आणि पेन्शन तपशील (पेन्शनची रक्कम आणि योगदानाची वारंवारता) नमूद करावी लागते. निवडलेल्या पेन्शन रकमेवर आधारित व्यक्तीच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत त्याच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेला परवानगी दिली जाते. देशभरातील अटल पेन्शन योजनेची खाती विविध कारणांमुळे बंद पडली आहे.
खाते बंद करताना खातेधारकाला ते का बंद करायचे आहे याचे कारण नमूद करावे लागते. योजनेनुसार खातेधारकाला ठराविक काळाने बँक खात्यात ठराविक रक्कम भरावी लागते. मात्र, अशी रक्कम त्वरित भरता येणे शक्य नसल्याने ती खाती बंद करण्यात आल्याचे बहुतेक खातेधारकांनी म्हटले होते. केंद्र सरकारने २०१५-१६ ते २०१९-२० पर्यंत योजनेत सामील झालेल्या व आयकरदात्या नसलेल्या प्रत्येक पात्र सदस्याला सह-योगदान केले होते.
बंद पडलेल्या खात्यांची टक्केवारी
राज्य बंद पडलेली खाती (टक्के)
पंजाब : २१.१२
उत्तर प्रदेश : २०.५५
हरियाणा : २०.३९
उत्तराखंड : १९.५७
आंध्र प्रदेश : १७.६९
पश्चिम बंगाल : १६.७७