पणजी : रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर बिलावर सक्तीने सर्विस चार्ज लावल्यास संबंधित रेस्टॉरंटविरोधात तक्रार दाखल करता येते. कारण सर्विस चार्ज लावण्याची सक्ती कोणतेही रेस्टॉरंट करू शकत नाही, असे स्पष्ट आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती ‘गोवा कॅन’ संस्थेकडून देण्यात आली आहे.
सर्विस चार्ज किंवा टिप ही ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असते. हे शुल्क स्वेच्छेने दिले जाऊ शकते; मात्र सक्ती करणे हे ग्राहक संरक्षण कायदा २०१९चे उल्लंघन मानले जाते. ग्राहकांचे हक्क व निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाने ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्पष्ट केले आहे की, रेस्टॉरंट वा हॉटेल ग्राहकांकडून सर्विस चार्ज जबरदस्तीने घेऊ शकत नाहीत. चुकीच्या पद्धतीने असे शुल्क वसूल करणे हा अन्यायकारक व्यवहार ठरतो.
गोव्यातील कोणतेही रेस्टॉरंट अशा प्रकारे सर्विस चार्ज आकारत असल्यास ग्राहकांना गोवा कॅन एनजीओच्या goacancomplaintscell@gmail.com या ई-मेलवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.