उत्तर भारतात निसर्गाने धारण केले रौद्र रूप

मुसळधार पाऊस, भूस्खलन व पूरामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
उत्तर भारतात निसर्गाने धारण केले रौद्र रूप

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर, हिमाचल, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील बदर गावात शनिवारी सकाळी झालेल्या भूस्खलनात दरडीखाली सापडून ११ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रामबन जिल्ह्यातील राजगढ येथे ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे.



हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील गोहर येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटी झाली. नांडी पंचायत परिसरातील नाल्यात अनेक गाड्या वाहून गेल्या. शिमल्यातील जतोग कँट भागात भूस्खलन झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सैन्याच्या निवासी इमारती रिकाम्या करण्यात आल्या. पंजाबमधील अमृतसर, पठाणकोटसह आठ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल २५० हून अधिक गावांत पाच ते पंधरा फूट पाणी साचले असून आतापर्यंत या भागात आठ जणांचा बळी गेला आहे, तर तीनजण बेपत्ता आहेत.



उत्तराखंडातील चमोली, रुद्रप्रयाग, टिहरी आणि बागेश्वर जिल्ह्यांत ढगफुटीच्या घटनांनी हाहाकार माजवला आहे. या दुर्घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला असून अकरा जण बेपत्ता आहेत. बागेश्वरातील कपकोट भागात अनेक घरे कोसळली आहेत. उत्तर प्रदेशातील १८ जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. आतापर्यंत ७७४ घरे कोसळली असून वाराणसीतील सर्व ८४ घाटांचा संपर्क तुटला आहे.


उत्तराखंड: रुद्रप्रयाग के अगस्त्यमुनि इलाके में शुक्रवार सुबह बादल फटा। SDRF की टीम रेस्क्यू के काम में लगी है।


जम्मू-कश्मीरच्या कटरा येथे गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे. २६ ऑगस्ट रोजी यात्रामार्गावर झालेल्या भूस्खलनात ३४ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर तब्बल २० लोक गंभीररित्या जखमी झाले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर व नांदेड जिल्ह्यांत ५० हून अधिक रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.


उत्तराखंड: चमोली में शुक्रवार को कई जगह लैंडस्लाइड हुआ। बद्रीनाथ नेशनल हाईवे भी बंद हो गया है।

हेही वाचा