नागपूर व नाशिकमध्ये गुन्हे दाखल
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सोशल मीडियावर चुकीच्या निवडणूक माहिती दिल्याप्रकरणी सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) चे सहसंचालक संजय कुमार यांच्यावर नागपूर व नाशिक येथे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली नोंदवण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये संजय कुमार यांनी विधानसभेतील मतदारसंख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचा दावा केला होता.
तहसीलदार रामटेक यांच्या तक्रारीवरून नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर नाशिक पोलिसांनी देवळाली मतदारसंघाबाबत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी प्रकरण नोंदवले, अशी माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. संजय कुमार यांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तब्बल ३८ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केला होता. तसेच नाशिकच्या देवळाली मतदारसंघातील मतदारसंख्येबाबतही चुकीची आकडेवारी सादर केली होती.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) ने या प्रकरणाची दखल घेत सीएसडीएसला कारणे दाखवा नोटीस जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसडीएसने आकडेवारीत फेरफार करून निवडणूक आयोगाच्या प्रतिमेला धक्का देत समाजात भ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला, असे परिषदेचे म्हणणे आहे. संजय कुमार यांनी मात्र एक्सवर चुकीची आकडेवारी पोस्ट केल्याबद्दल माफी मागत ते पोस्ट हटवले. तरीही आयसीएसएसआर ने याला गंभीर मानत पुढील कारवाईसाठी नोटीस देण्याचे ठरवले आहे. सीएसडीएसला आयसीएसएसआर कडून अनुदान मिळते आणि त्यामुळे या प्रकाराकडे संशोधन संस्थेच्या जबाबदारीच्या उल्लंघन म्हणून पाहिले जात आहे.