पठाणकोट : पंजाबमधील माधोपुर हेडवर्क्स येथे पूराच्या पाण्यात अडकलेल्या सीआरपीएफच्या जवानांना भारतीय लष्कराच्या एव्हिएशन विंगने थरारक बचाव मोहिम राबवून सुरक्षितरित्या बाहेर काढले. उड्डाणाच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती असूनही हेलिकॉप्टरच्या मदतीने जवानांना वाचवण्यात आले. विशेष म्हणजे जवानांची सुटका होताच ती इमारत कोसळली.
पूराच्या पाण्याने वेढलेल्या धोकादायक इमारतीत काही नागरिक आणि २५ सीआरपीएफ जवान हे जीवघेण्या स्थितीत अडकलेले होते. परिस्थिती पाहता काल बुधवारी सकाळी लष्कराच्या एव्हिएशन विंगचे हेलिकॉप्टर या मोहिमेसाठी पाठवण्यात आले. हेलिकॉप्टरने पूरग्रस्त परिसरावर उड्डाण करत थेट इमारतीच्या छतावर जवानांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. या मोहिमेत सैनिकांचे धैर्य, कौशल्य आणि दृढनिश्चय यांची कसोटी लागली.
भारतीय लष्कराने आपल्या एक्स आणि इंस्टाग्राम हँडलवर या थरारक बचाव मोहिमेचे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. सुटकेनंतर क्षणातच इमारत कोसळल्याचा व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या ऑपरेशनसाठी ‘उच्चस्तरीय उड्डाण कौशल्य आणि अप्रतिम शौर्य’ आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.