डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
पुणे : पुण्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे कोमकर कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर उपचारातील हलगर्जीपणाचा गंभीर आरोप केला आहे. बापू बाळकृष्ण कोमकर यांना लिव्हरची शस्त्रक्रिया करावी लागली.
पत्नी कामिनी कोमकर यांनी त्यासाठी स्वतःचे लिव्हर दान केले. मात्र, शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांतच बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. तर, पत्नी कामिनी कोमकर यांचा मृत्यू तब्बल आठ दिवसांनी रुग्णालयात झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोमकर कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
नातेवाईकांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर कामिनी कोमकर व्यवस्थित होती, खात-पित होती. परंतु अचानक तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या मृत्यूचे नेमके कारण न उघड केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. उपचारात हलगर्जीपणाच झाल्यानेच पती-पत्नीचा बळी गेला, असा नातेवाईकांचा ठाम आरोप आहे.
या शस्त्रक्रियेसाठी कोमकर कुटुंबाने कर्ज काढले होते, व्याजाने पैसे उभे केले होते. सुरक्षित शस्त्रक्रियेचे आश्वासन मिळूनही दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या लहान मुलावर दुहेरी आघात झाला आहे. आई-वडील गमावल्याने तो पूर्णपणे पोरका झाला आहे. या घटनेनंतर सह्याद्री हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. वैद्यकीय उपचारांतील हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी कोमकर कुटुंब आणि स्थानिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, सह्याद्री हॉस्पिटलने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. आम्ही या दु:खात कोमकर कुटुंबाशी पूर्ण सहानुभूती व्यक्त करतो. लिव्हर ट्रान्सप्लांट ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून, या प्रकरणात रुग्ण एंड-स्टेज लिव्हर डिसीजने ग्रस्त असल्यामुळे तो हाय रिस्क रुग्ण होता. शस्त्रक्रियेपूर्वी कुटुंबाला सर्व धोके समजावून सांगितले होते, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
शस्त्रक्रियेनंतर बापू कोमकर यांना कार्डिओजेनिक शॉक आला आणि सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. सुरुवातीला डोनर कामिनी कोमकर यांची प्रकृती सुधारत होती, मात्र सहाव्या दिवशी त्यांना अचानक हायपोटेन्सिव्ह शॉक आला आणि त्यानंतर मल्टी-ऑर्गन डिस्फंक्शन झाले. प्रगत उपचार करूनही त्यांना वाचवणे शक्य झाले नाही, असे रुग्णालयाने पुढे स्पष्ट केले.