खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास लक्झरी बसला भीषण आग लागली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
ही बस (एम.एच. ०२ एफ. जी. २१२१) मालवणच्या दिशेने निघाली होती. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी बस अचानक थांबवावी लागली. प्रवासादरम्यान टायर फुटल्याचा मोठा आवाज आला आणि काही क्षणांतच बसला आगीने वेढले. वाहन चालक सचिन लोके यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना बाहेर काढत धाडस दाखवले. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला आणि मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस व खेड-महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच खेड येथील मदत ग्रुपच्या प्रसाद गांधी यांच्या टीमनेही घटनास्थळी मदत केली. मात्र आगीमुळे बस पूर्णतः जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक कोकणाच्या दिशेने प्रवास करत असताना अशी दुर्घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.