बंगळुरू : कर्नाटकातील धर्मस्थळ येथील कथित सामूहिक बलात्कार आणि खुनांच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून धक्कादायक आरोप करणाऱ्या तक्रारदार सी. एन. चिन्नय्या उर्फ चेन्ना यालाच राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे. चिन्नय्याने गेल्या दोन दशकांत धर्मस्थळ मंदिर परिसरात बलात्कार, खून आणि मृतदेह दफन करण्यात आल्याचे गंभीर आरोप केले होते. त्याच्या तक्रारीवरून जुलैमध्ये धर्मस्थळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १९ जुलै रोजी सरकारने एसआयटी स्थापन करून तपास सुरू केला.
एसआयटी प्रमुख प्रणब मोहंती यांनी शुक्रवारी उशिरापर्यंत चिन्नय्याची चौकशी केली. त्याच्या जबाब आणि दस्तऐवजांत मोठा फरक आढळल्याने शनिवारी त्याला अटक करण्यात आली. त्याला फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट विजयेंद्र यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असून एसआयटीच्या १० दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चिन्नय्याने १९९५ ते २०१४ या काळात धर्मस्थळात सफाई कर्मचारी म्हणून काम केले असल्याचा दावा केला होता. त्याला महिलांचे तसेच अल्पवयीन मुलींचे मृतदेह दफन करण्यास भाग पाडले जात असल्याचेही त्याने सांगितले होते. काही प्रकरणांत लैंगिक अत्याचाराचेही पुरावे असल्याचा त्याचा आरोप होता. त्याच्या तक्रारीनंतर एसआयटीने आतापर्यंत १३ ठिकाणी उत्खनन केले असून, एक मानवी सांगाडा आणि काही हाडे सापडली आहेत. मात्र, या तपासातून मोठा पुरावा हाती लागलेला नाही.
धर्मस्थळ हे मंगळुरुजवळील नेत्रावती नदीकाठी वसलेले प्रसिद्ध मंदिर असून भगवान शिवाच्या मंजूनाथ स्वरूपाला येथे पूजले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पूजा हिंदू पुजारी करतात, तर व्यवस्थापन जैन समाजाकडे आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शन घेतात.