मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी

वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी

मुंबई : लोकप्रिय मराठी व हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठे (वय ३८) यांचे आज रविवारी ३१ ऑगस्ट पहाटे चार वाजता निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

ठाण्यात २३ एप्रिल १९८७ रोजी जन्मलेल्या प्रियाने २००६ मध्ये ‘या सुखांनो या’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच गीत मी गात आहे’ यांसारख्या मालिकांमधील त्यांनी साकारलेली भूमिकांनी ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. आरोग्याच्या कारणास्तव तिला ‘तुझेच गीत मी गात आहे’ ही मालिका मध्येच सोडावी लागली होती. हिंदी मालिकांमध्येही प्रियाने भक्कम छाप उमटवली होती. विशेषतः ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आजही आठवते. याशिवाय ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’ या मालिकांमध्येही ती झळकली होती.

चित्रपटसृष्टीतदेखील प्रियाने आपला ठसा उमटवला. ‘विघ्नहर्ता महागणपती’ (२०१६) आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ (२०१६) या चित्रपटांमधून तिचं वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची. तिच्या चाहत्यांशी संवाद साधत राहायची. तिच्या अचानक निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.