
या शुक्रवारी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. शोभिता धुलिपाल हिचा थरारक क्राईम थ्रिलर ‘चिकातिलो’ असो, किंवा धनुष आणि क्रिती सेनन यांचा रोमँटिक चित्रपट ‘तेरे इश्क में’, तसेच मनीष मल्होत्रा निर्मित ‘गुस्ताख इश्क’. या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी आहे.
‘गुस्ताख इश्क’ । जीओ हॉटस्टार
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात घडणारी ही कथा नवाबुद्दीन सैफुद्दीन रहमान उर्फ पप्पन (विजय वर्मा) याच्याभोवती फिरते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रिंटिंग प्रेस पुन्हा उभी करण्यासाठी तो प्रसिद्ध एकांतप्रिय कवी अजीज बेग (नसीरुद्दीन शाह) यांचा शोध घेत पंजाबला जातो. तिथे तो अजीज यांची मुलगी मिन्नी (फातिमा सना शेख) हिच्या प्रेमात पडतो. पुढे त्याला करिअर आणि प्रेम यांपैकी एक निवडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागतो.
स्पेस जेन : चांद्रयान । जीओ हॉटस्टार
ही वेबसीरिज इस्रोच्या चांद्रयान-२ च्या अपयशापासून चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास दाखवते. यात श्रिया सरन आणि नकुल मेहता मुख्य भूमिकेत आहेत.

चिकातिलो । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
तेलगू भाषेतील हा क्राईम थ्रिलर शोभिता धुलिपाल हिच्या भोवती फिरतो. ती एका ट्रू-क्राईम पॉडकास्टरची भूमिका साकारते, जी आपल्या जिवलग मैत्रिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य शोधण्यासाठी गुन्हेगारी जगात शिरते. ती खरा मारेकरी शोधू शकणार का, हाच या चित्रपटाचा मुख्य थरार आहे.
मार्क । जिओहॉटस्टार
कन्नड अॅक्शन थ्रिलरमध्ये किच्चा सुदीप निलंबित पोलीस अधीक्षक अजय मार्कंड याची भूमिका साकारतो. कर्नाटकात घडणाऱ्या हिंसक घटनांचा तपास करताना त्याला एका मोठ्या बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करतो.
तेरे इश्क में । नेटफ्लिक्स
हा रोमँटिक ड्रामा फ्लाइट लेफ्टनंट शंकर (धनुष) आणि मानसशास्त्रज्ञ मुक्ती (क्रिती सेनन) यांच्या कथेवर आधारित आहे. अनेक वर्षांनंतर ते पुन्हा भेटतात, पण दोघांच्याही आयुष्यात बरेच बदल झालेले असतात. जुने प्रेम, न संपलेली भावना आणि नवे आयुष्य यांचा संघर्ष या कथेत पाहायला मिळतो.
सिराई । झी५
या चित्रपटात विक्रम प्रभू काथिरवन या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याला खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या अब्दुल रौफला वेल्लोर तुरुंगातून शिवगंगाई न्यायालयात घेऊन जाण्याची जबाबदारी दिली जाते. या प्रवासात होणाऱ्या संवादातून अब्दुल निरपराध असल्याचे धक्कादायक सत्य समोर येते.
द बिग फेक । नेटफ्लिक्स
१९७० च्या दशकातील रोममध्ये घडणारी हा इटालियन क्राईम ड्रामा सत्य घटनेवर आधारित आहे. टोनी चिकियारेली या तरुण कलाकाराची प्रसिद्ध चित्रकार होण्याची स्वप्ने त्याला गुन्हेगारी जगात घेऊन जातात आणि तो एक मास्टर बनावट चित्रकार (फोर्जर) बनतो. महत्त्वाकांक्षेची काळी बाजू दाखवणारा हा चित्रपट आहे.