‘दशावतार’ चित्रपटाची ऑस्कर स्पर्धेत ऐतिहासिक निवड

मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd January, 06:29 pm
‘दशावतार’ चित्रपटाची ऑस्कर स्पर्धेत ऐतिहासिक निवड

मुंबई : ‘दशावतार’ चित्रपटाची ९८ व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर २०२६) मुख्य स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवड होणाऱ्या यादीत स्थान मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. यामुळे चित्रपटाला अकादमीच्या अधिकृत स्क्रीनिंग रूममध्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असून, हा क्षण मराठी सिनेमासाठी ऐतिहासिक मानला जात आहे.
२०२५ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरले असून, या यशाच्या शिखरावर पोहोचलेला चित्रपट म्हणजे ‘दशावतार’. १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेवर आधारित हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा थ्रिलर असून, त्यात संस्कृती, अध्यात्म, निसर्ग आणि मानवी संघर्ष यांचा प्रभावी संगम साधण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा ज्येष्ठ दशावतार कलाकार बाबुली मिस्त्री (दिलीप प्रभावळकर) यांच्या जीवनाभोवती फिरते. त्यांच्या अंतिम नाट्यप्रदर्शनाच्या रात्री घडणाऱ्या घटनांमधून भगवान विष्णूंच्या दहा अवतारांची संकल्पना आधुनिक सामाजिक संदर्भात उलगडली जाते. श्रद्धा, अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुरेख मेळ घालत हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करतो.
चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांसारख्या दिग्गज व नवोदित कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. कोकणाच्या निसर्गसौंदर्याचे वास्तववादी चित्रण आणि लोककलेचे दर्शन हे चित्रपटाचे मोठे वैशिष्ट्य ठरले आहे. बॉक्स ऑफिसवरही ‘दशावतार’ने दमदार कामगिरी करत २०२५ मधील सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले, कष्ट, प्रामाणिक मेहनत आणि मोठी स्वप्ने पाहण्याची ताकद काय असते, हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. फक्त आपल्या कामावर विश्वास ठेवणे, नम्रतेने सातत्याने मेहनत करत राहणे आणि अपयश आले तरी पुन्हा उभे राहण्याची हिंमत, याचाच हा परिणाम आहे.
आज ‘दशावतार’ला ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत निवड झाल्याचा मेल आला. गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीला जागतिक पातळीवर मिळालेली ही मान्यता केवळ चित्रपटासाठी नाही, तर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद आहे.
मराठी सिनेसृष्टीसाठी नवे दालन
‘दशावतार’च्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवे बळ मिळाले असून, मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर समर्थपणे उभा राहू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून मराठी संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मराठी सिनेमाप्रेमींसाठी हा क्षण खऱ्या अर्थाने अभिमानाचा आहे.

हेही वाचा