फोंड्यात वेश्या व्यवसायात गुंतलेल्या रॅकेटचा पर्दाफाश

तरुणीची सुटका, तीन संशयितांना अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
फोंड्यात वेश्या व्यवसायात गुंतलेल्या रॅकेटचा पर्दाफाश

पणजी : गोव्यात फोंडा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फोंडा पोलिसांनी शनिवारी  ३० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा रहिवासी वस्तीत असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका तरुणीची सुटका करण्यात आली असून पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई रात्री ११.५० वाजता एका हॉटेलच्या खोली क्रमांक २०२ मध्ये करण्यात आली. पोलिसांनी या मोहिमेत एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली. एका बनावट गिऱ्हाईकाद्वारे छापा टाकण्यात आला. संशयितांना पीडित तरुणीला पोलिसांनी पेरलेल्या गिऱ्हाईकाकडे सुपूर्द करण्याच्या प्रयत्नात असताना रंगेहात पकडले. संबंधित तरुणीला मानवी तस्करांनी गोव्यात आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. नजीम (३३, रा. पुरुलिया, पश्चिम बंगाल), जमीदार (३८, रा. पुरुलिया, पश्चिम बंगाल) आणि राजेश गौड (४९, रा. पर्वरी, मूळ रा. आझमगढ, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली असून, चौथा संशयित एस. के. कुरेशी याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ सह ३(५) तसेच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.