वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा परवाना होईल रद्द

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा परवाना होईल रद्द

पणजी : गोवा पोलिसांनी रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभर जनजागृती उपक्रम राबवले जात असून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी वाहतूक संचालनालयाला पत्र लिहून दारू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या किंवा गंभीर नियमभंग करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची मागणी केली आहे.

२०२४ मध्ये गोव्यात एकूण ४४० गंभीर अपघात झाले होते, ज्यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले किंवा गंभीर दुखापती झाल्या. २०२५ मध्येही ही चिंताजनक प्रवृत्ती कायम असून ३० जूनपर्यंत तब्बल २२६ गंभीर अपघातांची नोंद झाली आहे. याशिवाय, फक्त २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल १.२ लाख वाहतूक नियमभंगांची नोंद झाली असून हा आकडा २०२४ मधील एकूण ४ लाख नियमभंगांपैकी जवळपास ३० टक्के आहे.

गोव्यातील अपघातांमध्ये बहुतांश ठिकाणी वेग मर्यादेचा भंग, मद्यधुंद अवस्थेत किंवा अमलीपदार्थांच्या प्रभावाखाली असलेला वाहनचालक, हेल्मेटसीटबेल्ट न वापरणे या कारणांचा मोठा वाटा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने अशा वाहनचालकांविरोधातझीरो टोलरेन्स मोहीम’ जाहीर करून नियम मोडणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कारवाई सुरू केली होती.

रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृतीसोबतच कठोर अंमलबजावणीचे धोरण अवलंबले जाईल, असा इशारा पोलिसांनी आता दिला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांचाही प्राण वाचवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.