नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १२५व्या भागातून जनतेशी संवाद साधत ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर भर दिला. खेळणी, कपडे, सजावट किंवा रोषणाईचे समान सर्व काही भारतात बनलेले असावे, असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मोदींनी मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात अथकपणे कार्यरत राहिलेल्या भारतीय सैन्य ,एनडीआरएफ,एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. जम्मू-काश्मीरमधील बदलत्या चित्रावर प्रकाश टाकताना मोदींनी पुलवामामध्ये झालेला पहिला डे-नाईट क्रिकेट सामना आणि श्रीनगरच्या डल सरोवरावरील पहिला ‘खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल’ ही दोन मोठी यशं देशासमोर मांडली. हजारो तरुणांचा सहभाग या कार्यक्रमांतून दिसून आल्याचं त्यांनी नमूद केले.
तसेच, यूपीएससी परीक्षेत थोडक्यात अपयशी ठरलेल्या उमेदवारांसाठी सरकारने तयार केलेल्या ‘प्रतिभा सेतु’ या डिजिटल पोर्टलची माहितीही त्यांनी दिली. या माध्यमातून दहा हजारांहून अधिक पात्र तरुणांचा डेटाबँक उपलब्ध असून, खासगी कंपन्यांनी त्यांना थेट नोकरी देण्यास सुरुवात केली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मोदींनी भारतभर साजरे होणाऱ्या सण-उत्सवात स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करत एकच मंत्र व्होकल फॉर लोकल, एकच मार्ग आत्मनिर्भर भारत आणि एकच ध्येय विकसित भारत, हा संकल्प करा असे त्यांनी देशवासियांना संबोधित करताना म्हटले.