उभ्या रेषेचे वर्तुळ

दयाराम पाडलोसकर यांची ‘उभ्या रेषेचे वर्तुळ’ ही कादंबरी केवळ वाचनाचा आनंद देत नाही, तर वाचकाला विचार करायला भाग पाडते. गाव, समाज, प्रगती आणि माणूस याबद्दल नवे प्रश्न समोर आणते.

Story: पुस्तक |
22 hours ago
उभ्या रेषेचे वर्तुळ

धारगळहून म्हापशाला येताना मला असं वाटत होतं – या बसमध्ये एखादा विजय तर नसेल ना? खूप दिवसांनी बाहेर पडलेला, आपली ओळख पुन्हा जगाशी दाखवण्याचा प्रयत्न करणारा हा माणूस समोर येतो आणि कादंबरी संपली तरी अनेक प्रश्न मनात घर करून राहतात. विशेषत: ‘उभ्या रेषेचे वर्तुळ’ हे नाव का दिले असेल, याची उत्सुकता वाचकाला सतत छेडत राहते आणि ते समजण्यासाठी संपूर्ण कथानकाचा मागोवा घेणे आवश्यक ठरते.

दयाराम पाडलोसकर लिखित ही कादंबरी त्यांच्या जन्मभूमी पेडण्याशी घट्ट जोडलेली आहे. लेखक मुळात पेडणेकर असल्याने ज्या मातीत ते रुजले, त्या मातीतली तळमळ, ओढ आणि वेदना या कादंबरीत सहजपणे डोकावतात. गावाचे वर्णन असो, पेडण्याच्या बोलीभाषेचे दर्शन असो किंवा बदलत्या पेडण्याचे वास्तव चित्रण असो – लेखकाची संवेदनशीलता ठिकठिकाणी ठळकपणे जाणवते. त्यामुळे वाचकांनी या कादंबरीकडे नक्कीच वळावे असे वाटते.

या कादंबरीत प्रेम आहे, आईची तळमळ आहे, मानवी नात्यांची गुंतागुंत आहे. बदलत्या काळासोबत गावही बदलत चाललेले आहे. प्रगतीच्या नावाखाली गावाची एकत्रितता हरवत चालली असली, तरीही गावकऱ्यांच्या मनात परंपरा आणि आपुलकी टिकून आहे. याचे एक उदाहरण म्हणजे गावातील एखादा माणूस सुखरूप बरा व्हावा, यासाठी सर्वजण एकत्र येऊन देवपूजा करतात. अशा प्रसंगी गावकरी एकत्र येतात, बोलतात, कामे ठरवतात आणि गाव एकसंध असल्याची भावना पुन्हा दृढ होते. अशा छोट्या छोट्या उदाहरणांतून लेखकाने गावजीवनाची खरी ओळख जिवंत केली आहे.

कादंबरीत तीन मुख्य पात्रे आहेत – दोन पुरुष आणि एक स्त्री. या स्त्रीचे आयुष्य अधुरे राहते. तिच्यावर झालेला अन्याय, समाजात जगण्यासाठी तिला करावा लागणारा संघर्ष आणि तिची अंत:करणाला भिडणारी तळमळ – हे सारे लेखकाने अत्यंत प्रभावीपणे रेखाटले आहे. तिच्या प्रत्येक टप्प्यातील भावना वास्तवदर्शी व स्पष्टपणे समोर येतात.

कादंबरीत पेडण्याची बोलीभाषा ठळकपणे जाणवते. स्थानिक शब्द, त्यांचे उच्चार आणि गोडवा यामुळे वाचनात एक वेगळाच आनंद मिळतो. प्रगतीच्या नावाखाली नाहक बळी गेलेले नैसर्गिक सौंदर्य, गावावर चढवलेला कृत्रिम मेकअप आणि त्यामागील वेदना – हे चित्रण वाचकाला अंतर्मुख करते. गावातील ओळखीचे चेहरे हळूहळू लुप्त होत आहेत, त्यांच्या जागी नवे व अनोळखी चेहरे उभे राहत आहेत, ही जाणीव मनाला चटका लावते.

ही कथा केवळ प्रेमकथा नाही, तर समाजातील बदल, प्रगतीचे वास्तव आणि त्यामध्ये हरवत चाललेला माणूस याची जाणीव करून देणारी कथा आहे. प्रेम, समाज, प्रगती आणि वेदना – या सगळ्यांचे सुंदर एकत्रीकरण या कादंबरीत आढळते. पुस्तकाची एकूण पाने ३२३ असून प्रत्येक प्रकरण नवे चिंतन देऊन जाते. या कादंबरीची खरी ताकद म्हणजे तिची वास्तवदर्शी मांडणी. ती वाचकाला थेट सत्याशी भिडवते. प्रगतीच्या नावाखाली होणारा विध्वंस, निसर्गाचे सौंदर्य हरवणे आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न – हे लेखकाने नितांत प्रामाणिकपणे दाखवले आहेत. पात्रांचे भावविश्व, बोलीभाषेचा गोडवा आणि बदलत्या काळाचे अचूक चित्रण यामुळे वाचकाला ही कथा जवळची वाटते.

पुस्तकाचे मुखपृष्ठ साधे असूनही प्रभावी आहे. काळोख आणि अंधाराच्या छटांमध्ये माणसासमोर उभे राहणारे प्रश्न त्यातून प्रतीत होतात आणि ते आशयाशी सुसंगत ठरते. टंकलेखन स्वच्छ, सुबक आणि वाचकाला सोयीचे आहे. अक्षरांचा आकार योग्य असल्याने वाचताना कुठलाही त्रास होत नाही.

दयाराम पाडलोसकर यांची ‘उभ्या रेषेचे वर्तुळ’ ही कादंबरी केवळ वाचनाचा आनंद देत नाही, तर वाचकाला विचार करायला भाग पाडते. गाव, समाज, प्रगती आणि माणूस याबद्दल नवे प्रश्न समोर आणते. म्हणूनच ही कादंबरी फक्त मनोरंजन न राहता, आयुष्याला आरसा दाखवणारा एक समृद्ध अनुभव ठरते.


स्नेहा बाबी मळीक