आज मी माझ्या डायरीत 'बसवाला मुलगा' हे नाव खोडून टाकलं आणि त्याच्या जागी 'अनिकेत' हे नाव लिहिलं. आता डिचोली ते पणजीचा प्रवास एकटेपणाचा राहिला नाही, तर तो दोघांच्या गप्पांचा आणि भविष्याच्या स्वप्नांचा प्रवास बनला आहे...
२३सप्टेंबर
आज पुन्हा एकदा सकाळच्या बसमध्ये बसले. डिचोलीतून पणजी युनिव्हर्सिटीकडे माझा रोजचा प्रवास. बी.एस्सी. फर्स्ट इयर. बसचा हा प्रवास म्हणजे माझ्यासाठी एका वेगळ्याच जगाची सफर असते. आजूबाजूला कितीतरी चेहरे, कितीतरी गोष्टी. पण माझं लक्ष मात्र नेहमी माझ्या बसमध्ये बसलेल्या त्या मुलाकडे असतं. तो रोज सकाळी त्याच वेळेत, त्याच जागेवर दिसतो. मला त्याचं नाव माहीत नाही, पण त्याची शांत नजर आणि चेहऱ्यावरचं स्मित माझ्या मनात घर करून बसलंय.
आज त्याने कानात हेडफोन्स घातले होते आणि तो काहीतरी वाचत होता. बसमध्ये एवढा गोंधळ असूनही तो किती शांत होता! जणू त्याला आजूबाजूच्या जगाची पर्वाच नव्हती. मलाही त्याच्यासारखं शांत राहायला आवडतं, पण माझं मन मात्र त्याच्या विचारात कितीतरी लांब निघून जातं.
मला आठवतं, पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हाच माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याचे केस थोडे मोठे आहेत आणि ते समोरून खाली येतात. त्याची शर्टची बाही नेहमी दुमडलेली असते, ज्यामुळे त्याच्या हातावरच्या शिरा दिसतात. मला ते खूप आवडतं. त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित असतं, जे खूपच आकर्षक वाटतं. त्याला बघून मला असं वाटतं, की माझ्यासारख्या साध्या मुलीलाही कोणीतरी आपल्या जगात सामील करून घेईल.
अगं डायरी, मी रोज तुझ्याशी त्याच्याबद्दल बोलते खरी! त्याला मी 'बसवाला मुलगा' असं नाव दिलंय आणि तो मला खूप खूप आवडतो हे फक्त तुला आणि मलाच माहीत असू दे हा! तो मला इतका का आवडतो??? अम्म्म... तो न, कोणाशीही जास्त बोलत नाही, फक्त शांतपणे बसलेला असतो. त्याच्या डोळ्यांत एक प्रकारची शांतता आणि विचार करण्याची खोली दिसते. तो माझ्या स्वप्नातला नायक आहे, जो मला रोज बसमध्ये दिसतो. मला वाटतं की तो एक चांगला माणूस असावा. त्याला बघून माझ्या दिवसाची सुरुवात होते. आणि आता तो माझ्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.
२४ सप्टेंबर
आज सकाळी तो माझ्याकडे पाहून हसला! मला वाटलं की तो माझ्याकडेच बघत आहे. पण नाही, त्याने डोक्याच्या केसांतून हात फिरवला आणि त्याच्या शेजारी बसलेल्या मित्राशी हसत हसत बोलू लागला. 'बसवाला मुलगा' एका क्षणात माझ्यासाठी 'स्वप्नातला मुलगा' बनला आहे. माझ्या मनात त्याच्यासाठी एक वेगळंच जग तयार झालंय. मला त्याच्याबद्दल अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे.
२७ सप्टेंबर
आजही तो दिसला. तो नेहमी त्याच्या बसच्या खिडकीजवळ बसतो. आज त्याने एक निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. तो नेहमीच साधे, पण नीटनेटके कपडे घालतो. तो कधीच माझ्याकडे बघत नाही. त्याला माझं अस्तित्वही माहीत नसेल. मी त्याला रोज इतकं जवळून बघते, त्याच्या प्रत्येक हालचालीचं निरीक्षण करते, पण त्याला काहीच फरक पडत नाही. तो त्याच्याच जगात असतो. कधीतरी मला वाटतं, एकदा तरी त्याने माझ्याकडे बघून हसावं. पण तसं काहीच घडत नाही.
०५ ऑक्टोबर
जवळजवळ एक आठवडा झाला, तो दिसला नाही. मी रोज बसमध्ये बसून त्याची वाट बघते. पण तो दिसत नाही. खरं तर ना, माझ्या मनाला आतून खूप दु:ख होतंय. कधीतरी मला असं वाटतं, की हा माझा वेडेपणा आहे. पण मन का आपल्या ताब्यात असतंय?! माझ्या मनात मी त्याच्यासाठी एक वेगळंच जग तयार केलंय... त्यात तो आहे, मी आहे... आणि आमच्या सोबत आहे हा एकत्र चाललेला बसमधला प्रवास! समांतर!!
१२ ऑक्टोबर
आज परत तो बसमध्ये दिसला. कित्ती आनंद झाला म्हणून सांगू! तो बसची वाट पाहत उभा असतानाच मी त्याला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तो त्याचा मोबाईल बघत होता, पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित होतं. माझ्या मनाला खूप आनंद झाला. चला तर बुवा, तो परत आला!
२२ ऑक्टोबर
आज आईसोबत म्हापसाच्या बाजारात गेले होते. कितीतरी गर्दी होती. आईला काहीतरी साहित्य घ्यायचं होतं म्हणून आम्ही आतपर्यंत गेलो. अचानक गर्दीत एक परिचित चेहरा दिसला. तोच 'बसवाला मुलगा'! पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक काकू होत्या. तो त्यांच्यासोबत बोलत असतानाच त्यांची नजर माझ्यावर पडली. त्याने मला ओळखलं! तो माझ्याकडे पाहून हसला.
माझी आई आणि तो ज्या काकूबरोबर होता, त्या दोघी एकमेकांना ओळखत होत्या. त्या बोलत असताना मला कळलं की त्या मुलाचं नाव अनिकेत आहे. त्याची आई डिचोलीतच त्यांच्या नातेवाईकांकडे आली होती. तो पणजीच्या एका कॉलेजमध्ये शिकतो, पण काही प्रोजेक्टच्या कामासाठी त्याला रोज म्हापसाला जावं लागत होतं. म्हणून तो रोज मला दिसायचा.
आईने त्याला आणि त्याच्या आईला आमच्या घरी चहासाठी बोलावलं. मी खूप आनंदून गेले. त्याने जाताना माझ्याकडे पाहिलं आणि हसला. त्याच्या डोळ्यात 'मी तुला रोज बघतो' असा भाव होता आणि माझ्या डोळ्यात 'मी तुला परत भेटणार' असा आनंद होता.
२९ ऑक्टोबर
आज अनिकेत त्याच्या आईसोबत आमच्या घरी आला. आम्ही खूप गप्पा मारल्या. मला कळलं की तो पणजीच्या कॉलेजमध्ये आर्किटेक्चर करतोय. त्यालाही माझ्यासारखंच गोव्याचा निसर्ग आणि शांतता आवडते. आम्ही बसमध्ये एकमेकांना रोज का बघायचो, यावरही हसलो. त्याने जाताना मला त्याचा नंबर दिला आणि म्हणाला, "रोज बसमध्ये बघण्यापेक्षा आता आपण बोलत राहू."
आज मी माझ्या डायरीत 'बसवाला मुलगा' हे नाव खोडून टाकलं आणि त्याच्या जागी 'अनिकेत' हे नाव लिहिलं. आता डिचोली ते पणजीचा प्रवास एकटेपणाचा राहिला नाही, तर तो दोघांच्या गप्पांचा आणि भविष्याच्या स्वप्नांचा प्रवास बनला आहे...
स्नेहा सुतार