संपूर्ण जगात ई-कचरा उत्पादकतेमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. सुमारे ७०% ई-कचरा केवळ संगणक उपकरणांमधून, १२% दूरसंचार क्षेत्रातून, ०८% वैद्यकीय उपकरणांमधून, तर ७% ई-कचरा वार्षिक उपकरणांमधून बाहेर पडतो.
वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्लास्टिक, काच, कॅन, बाटल्यांसारख्या अविघटनशील कचऱ्यामुळे पृथ्वीतलावर कचऱ्याचा स्वतंत्र असा थर निर्माण होत असतानाच नवीन प्रकारच्या कचऱ्याची समस्या तोंड वर काढत आहे. ती म्हणजे ई-वेस्ट कचऱ्याची समस्या.
ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक-वेस्ट) किंवा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये संगणक, टीव्ही, मॉनिटर्स, मोबाईल फोन, पीडीए, व्हीसीआर, ट्युबलाईट, सीडी प्लेयर, फॅक्स मशीन, प्रिंटर, कॉम्प्युटर, दूरचित्रवाणी, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल व अन्य उपकरणांचा समावेश होतो. ई कचऱ्याचे बरेच स्त्रोत आहेत. हे स्त्रोत प्रामुख्याने तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत. पांढर्या वस्तू, तपकिरी वस्तू व राखाडी वस्तू. पांढर्या वस्तूंमध्ये वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्रांचा समावेश होतो. तपकिरी वस्तूंमध्ये दूरदर्शन, कॅमेरे इत्यादी वस्तु येतात, तर राखाडी वस्तूंमध्ये संगणक, स्कॅनर, प्रिंटर, मोबाईल फोन आदींचा समावेश होतो.
संपूर्ण जगात ई-कचरा उत्पादकतेमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. सुमारे ७०% ई-कचरा केवळ संगणक उपकरणांमधून, १२% दूरसंचार क्षेत्रातून, ०८% वैद्यकीय उपकरणांमधून, तर ७% ई-कचरा वार्षिक उपकरणांमधून बाहेर पडतो. सरकारी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या एकत्रितपणे ७५% पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा तयार करतात, तर वैयक्तिक किंवा घरांतील केवळ १९% उत्पादन होते.
ई-कचऱ्यामुळे मानव, प्राणी आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. ई-कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास त्यातील विषारी धातू आणि रसायने माती-पीक-अन्न या मार्गे माणसाच्या पोटात प्रवेश करतात. हे धातू सजीवांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. या रसायनांचे मानवावर आणि इतर प्राण्यांवर खूप वाईट परिणाम होतात ज्यामुळे मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि कंकाल प्रणाली खराब होते. हे धातू गरोदर महिलांच्या संपर्कात आल्यास अपंग मुले जन्माला येऊ शकतात.
मोबाईल फोन, संगणकांच्या बॅटरीज, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमधील शिसे, बेरियम, पारा, लिथियमसारखी रसायने भूजल वाहिन्या, ओढे, विहीर, नाले, ओहोळामध्ये पोहोचल्यास जल प्रदूषण होते. खराब सेलफोन, निकामी झालेली बॅटरी टाकून देऊ नये. ती पुनर्वापर संस्थांना, अधिकृत संग्रह केंद्रावर, रिसायकलिंग करणाऱ्या अधिकृत संस्थेकडे किंवा त्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडे जमा करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठवावी. ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या अप्रशिक्षित व्यक्तींना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. पंचायत मंडळाने नागरिकांना घरातील ई-कचरा उघड्यावर टाकू नये यासाठी लोकजागृती केली पाहिजे.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)