मडगाव : मे. तत्सवी अँड मणिकांता व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीत डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या अंजली नाईक हिच्या विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीचा विश्वासघात केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
वास्को येथे मे. तत्सवी अँड मणिकांता व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. कंपनीचे एक कार्यालय घोगळ मडगाव येथे आहे. या कार्यालयात अंजली नाईक ही डाटा ऑपरेटर म्हणून कामाला आहे. तिच्याविरोधात कंपनीचे संचालक अखिल चढ्ढा यांनी फातोर्डा पोलिसात तक्रार नोंद केली आहे. अंजली हिने कंपनीच्या प्रकल्पासाठी स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तमिळनाडू लिमिटेड यांच्या मूळ कागदपत्रात बदल करत ते कागदपत्र कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता चेन्नई येथील बँकेला पाठवले. या प्रकारामुळे कंपनीला कर्जाची प्रक्रिया करण्यासाठी व आवश्यक परवानगी मिळवण्यात विलंब झाला. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयित अंजली नाईक हिच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.