‘व्हाईटवॉश’ टाळण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

न्यूझीलंड​विरुद्ध अखेरची कसोटी मुंबई येथे उद्यापासून

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
30th October, 11:29 pm
‘व्हाईटवॉश’ टाळण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

मुंबई : न्यूझीलंडने मायदेशातच टीम इंडियाला पराभूत करून खळबळ उडवून दिली. न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात भारतात इतिहास घडवला. न्यूझीलंडने टीम इंडियाविरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंडने बंगळुरुनंतर पुण्यात टीम इंडियाला लोळवले आणि मालिका जिंकली. न्यूझीलंडची ही भारतात कसोटी मालिका जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर आता उभयसंघातील तिसरा आणि अखेरचा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे १ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आपल्या घरच्या मैदानात सामान खेळण्यासाठी उत्सुक आहे. रोहित तब्बल ११ वर्षानंतर घरच्या मैदानात कसोटी सामना खेळणार आहे.त्यामुळे रोहितसाठी हा सामना अविस्मरणीय असा असणार आहे.
टीम इंडिया या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. त्यात रोहितच्या घरच्या मैदानात तिसरा आणि अंतिम सामना आहे. टीम इंडियावर व्हाईटवॉशची टांगती तलवार आहे. अशात रोहितसाठी कर्णधार म्हणून आणि घरच्या मैदानात सामना असल्याने हा सामना दोन्ही बाबतीने प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे रोहितसेनेचा हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रोहितकडून टीम इंडियाला आणि चाहत्यांना त्याने ११ वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.रोहितने वानखेडे स्टेडियममध्ये अखेरचा कसोटी सामना हा २०१३ साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकीर्दीतील हा २०० वा आणि अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. तेव्हापासून रोहित या स्टेडियममध्ये असंख्य सामने जिंकले आहेत. मात्र एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना आपल्या लाडक्या रोहितला अनेक वर्षांनी घरच्या मैदानात पाहण्याची प्रतिक्षाही संपणार आहे.
रोहितने सचिनच्या निरोपाच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. रोहितने तेव्हा १२७ बॉलमध्ये ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १११ धावा केल्या होत्या. तसेच रोहितने त्या संपूर्ण मालिकेत २८८ धावा केल्या होत्या. रोहितला त्या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
दरम्यान रोहितला गेल्या अनेक कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी अशी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रोहितकडून एका झंझावाती आणि चिवट खेळीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे रोहितवर एक कर्णधार, फलंदाज आणि स्थानिक खेळाडू म्हणून असंख्य अपेक्षा आहेत. आता रोहित या अपेक्षांवर किती खरा उतरतो? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
या सामन्यापूर्वी किवी संघाला धक्का बसला असून, तिसऱ्या कसोटीतून केन विल्यमसन बाहेर पडला आहे. विल्यमसन दुखापतीमुळे बेंगळुरू आणि पुण्यातील कसोटीत खेळू शकला नव्हता. न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले की, विलियमसनने चांगली प्रगती केली आहे, परंतु सावधगिरी बाळगल्याने तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल. केन त्याच्या दुखापतीतून सावरत आहे, पण पूर्णपणे संघात खेळण्यासाठी तो तयार नाही, असे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले. तो दुखापतीतून लवकर सावरेल असे चिन्ह असताना आम्हाला वाटते की तो न्यूझीलंडमध्ये राहणे आणि त्याच्या पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करणे त्याच्यासाठी चांगले आहे जेणेकरून तो इंग्लंडविरूद्ध मालिकेसाठी तयार होऊ शकेल. इंग्लंड मालिकेला अजून एक महिना बाकी आहे. म्हणून आता सावध दृष्टिकोन स्वीकारल्यास तो क्राइस्टचर्चमधील पहिल्या कसोटीसाठी तो मैदानात उतरेल.
दरम्यान, दिल्लीचा जलदगती गोलंदाज हर्षित राणाचाचा मुंबई टेस्टसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने यावर्षीच्या आयपीएल सिझनचे विजेतेपद पटकावण्यात हर्षितच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा वाटा होता. तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चेंडू आणि बॅट दोन्ही माध्यमातून आश्वासक कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या १८ सदस्यीय टीममध्येही हर्षितचा समावेश आहे. हर्षितने वेग आणि अचूकतेच्या जोरावर राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-२० सीरिजसाठीही त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. पण, त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यानंतरही हर्षित सातत्याने त्याची क्षमता सिद्ध करत आहे.
दिल्ली विरुद्ध आसाम या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात हर्षितने त्याची क्षमता सिद्ध केली. त्याने त्या सामन्यामध्ये एका डावामध्ये ५ बळी घेतले. त्यानंतर ५९ रनची उपयुक्त खेळी केली. हर्षितच्या ऑल राऊंड कामगिरीच्या मदतीने दिल्लीने तो सामना १० गड्यांनी जिंकला. त्याचबरोबर बोनस पॉईंट्सचीही कमाई केली.
मुंबईत भारताचे पारडे जड
गेल्या १२ वर्षांत भारतीय संघ या मैदानावर एकही कसोटी सामना हरलेला नाही. या मैदानावर शेवटची कसोटी डिसेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध होती. भारताने हा सामना ३७२ धावांच्या फरकाने जिंकला. भारतीय संघाला नोव्हेंबर २०१२ मध्ये वानखेडेवर शेवटचा पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. यानंतर भारतीय संघाने या मैदानावर तीन कसोटी खेळल्या आणि तिन्ही जिंकल्या. या काळात अनुक्रमे वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव झाला.बाॅक्स
वानखेडेवर भारतीय संघाचा कसोटी इतिहास
सामने: २६ | विजय: १२ | पराजय: ७ | अनिर्णित: ७

वानखेडेवर न्यूझीलंड संघाचा कसोटी इतिहास
सामने: ३ | विजय: १ | पराभूत: २
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षीत राणा.

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, राचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी, टीम साउथी आणि विल यंग.

हेही वाचा