दिवसअखेर इंग्लंड ३ बाद २११ : रूट–ब्रूक यांची नाबाद शतकी भागीदारी

सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस २०२५-२६ मालिकेतील पाचव्या व अंतिम कसोटी सामन्याला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (एससीजी) सुरुवात झाली. मात्र, पाऊस आणि खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवशी केवळ ४५ षटकांचाच खेळ होऊ शकला.
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिवसअखेर इंग्लंडने ३ गडी गमावून २११ धावा केल्या असून जो रूट (७२) आणि हॅरी ब्रूक (७८) नाबाद आहेत. दोघांमध्ये १५४ धावांची अभेद्य भागीदारी झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सोमवारी सकाळी भारतीय वेळेनुसार ४.३० वाजता सुरू होईल.
इंग्लंडची सुरुवात मात्र निराशाजनक ठरली. अवघ्या ५७ धावांत इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले. बेन डकेट २७, जॅक क्रॉली १६ आणि जेकब बेथेल १० धावा करून माघारी परतले. यानंतर अनुभवी जो रूट आणि युवा फलंदाज हॅरी ब्रूक यांनी संयमी व आत्मविश्वासपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतके झळकावत इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, मायकेल नेसर आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकाही मुख्य फिरकीपटूला संघात स्थान दिलेले नाही, हा निर्णय विशेष चर्चेचा ठरला आहे. १३८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलिया फिरकीपटूशिवाय मैदानात उतरला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी हा निर्णय परिस्थितीजन्य असल्याचे स्पष्ट केले.
मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक टप्पा
या कसोटीसह मिचेल स्टार्कने आपल्या कारकिर्दीतील ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत मोठा पराक्रम केला. तो ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली यांच्यानंतर हा टप्पा गाठणारा तिसरा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ठरला आहे.
स्टार्कने ३०० सामन्यांमध्ये १०५ कसोटी, १३० वनडे, ६५ टी-२० सामने खेळले आहेत. एकूण ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये ३०० सामने खेळणारा तो १४ वा खेळाडू आहे.
स्टार्कच्या नावावर सध्या ४२९ कसोटी विकेट्स असून, या कसोटीत आणखी ५ विकेट्स घेतल्यास तो कसोटी इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम रंगना हेराथ (४३३ विकेट्स) यांच्या नावावर आहे.
जो रूटचा आणखी एक विक्रम
या सामन्यात जो रूटने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याची ही ६६ वी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी ठरली असून, यासह त्याने महेला जयवर्धने (६५) यांना मागे टाकत या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. रूट सध्या कसोटीतील एकूण धावसंख्येत १३,८४९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, सचिन तेंडुलकरचा १५,९२१ धावांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला अजून २,०७२ धावांची गरज आहे.
कसोटीत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा
सचिन तेंडुलकर – १०२
जॅक कॅलिस – ७१
जो रूट – ६६
महेला जयवर्धने – ६५
स्टार्क मॅकग्रा आणि ब्रेट लीच्या यादीत सामील
ग्लेन मॅकग्रा: ३७६ सामने (१२४ कसोटी, २५० वनडे, २ टी-२०)
ब्रेट ली: ३२२ सामने (७६ कसोटी, २२१ वनडे, २५ टी-२०)
मिचेल स्टार्क: ३०० सामने (१०५ कसोटी, १३० वनडे, ६५ टी-२०)
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू
रिकी पॉन्टिंग (फलंदाज) ५५९
स्टीव्ह वॉ (फलंदाज) ४९३
ॲलन बॉर्डर (फलंदाज) ४२९
ॲडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक) ३९५
मायकेल क्लार्क (फलंदाज) ३९४
मिचेल स्टार्क (गोलंदाज) ३००*