शुभमन गिल, श्रेयस अय्यरचे पुनरागमन : ‘रो-को’वर सर्वांचे लक्ष

वडोदरा : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून वडोदरा येथे सुरुवात होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मागील वनडे मालिका भारताने २-१ अशी जिंकली होती. त्या मालिकेत दुखापतीमुळे बाहेर असलेला कर्णधार शुभमन गिल तसेच उपकर्णधार श्रेयस अय्यर या मालिकेत पुनरागमन करत आहेत. त्यामुळे यावेळी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघाची टॉप ऑर्डर अत्यंत मजबूत दिसत आहे. रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल हे दोघे डावाची सुरुवात करतील. त्यानंतर नेहमीप्रमाणे चेस मास्टर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरेल. दुखापतीतून परतलेला श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार असून, त्यामुळे मधल्या फळीत स्थिरता मिळेल. श्रेयसने नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून दोन दमदार खेळी केल्या असून त्याचा आत्मविश्वास निश्चितच उंचावलेला आहे.
केएल राहुल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे संघाला अधिक लवचिकता मिळते. त्यामुळे यावेळीही ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनबाहेर बसावे लागू शकते.
अष्टपैलू विभागात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची फिरकी जोडी दिसू शकते. वेगवान गोलंदाजीमध्ये भारत दोन मुख्य सीमर्ससह उतरल्यास मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबत हर्षित राणा याला संधी मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजी आक्रमणात विविधता आणण्यासाठी मनगटी फिरकीपटू कुलदीप यादव याचाही समावेश अपेक्षित आहे.
ही मालिका २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कारण त्या स्पर्धेपर्यंत भारताला १८ वन डे सामने खेळायला मिळणार आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापन आतापासून संघबांधणीवर भर देणार आहे. त्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळतेय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
रोहित, विराट हे सीनियर खेळाडू संघात असल्याने त्यांचे प्लेइंग इलेव्हनमध्ये असणे निश्चित आहे. कर्णधार शुभमन गिल आणि उप कर्णधार श्रेयस अय्यर पुनरागमन करणार असल्याने तेही ११ मध्ये असतीलच. पण, उर्वरित ७ जागांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. रोहित व शुभमन ही जोडी सलामीला निश्चित असल्याने यशस्वी जैस्वालला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणे अवघड आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत शतक झळकावले असले तरी शुभमनच्या पुनरागमनाने त्याला संघाबाहेर बसावे लागेल.
हार्दिक पांड्याला वन डे संघात स्थान मिळालेले नाही आणि अक्षर पटेलही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघाचा सदस्य नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यता आहे.
पहिला सामना हा बडोदा इथे आयोजित करण्यात आला आहे. यासह तब्बल १५ वर्षांनंतर बडोदाला आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. नवीन स्टेडियममधील हा पहिलावहिला सामना असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांमुळे हा सामना आणखी खास होणार आहे. हा क्षण कायम लक्षात रहावा अर्थात अविस्मरणीय व्हावा यासाठी बडोदा क्रिकेट असोसिएशनकडून खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
रोहित-विराटचा सन्मान
उभयसंघातील पहिला सामना हा कोटंबी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे या सामन्याला बीसीसीआय अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रविवार ११ जानेवारी बीसीएसाठी फार मोठा दिवस असणार आहे. तसेच बीसीए या सामन्याआधी रोहित आणि विराट या अनुभवी जोडीचा खास सन्मान करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामन्याआधी रोहित आणि विराटसाठी बीसीएकडून एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
रोहित-विराटचा अखेरचा सामना!
रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताची ही जोडी त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. तसेच दोघेही टी-२० आणि कसोटीतील निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदिवसीय प्रकारातच सक्रीय आहेत. त्यामुळे या दोघांच्या सामन्यांना तोबा गर्दी असते. बडोद्यातील या दोघांचा अखेरचा सामना असल्याचे समजले जात आहे. या मैदानात पुन्हा सामना होईल तेव्हा हे दोघे संघात असतील की नाही? याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे बीसीए या दोघांना सन्मानित करण्यासाठी उत्सूक आहेत.
सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम धोक्यात!
भारत-न्यूझीलंड वनडे सामन्यांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्ध ४२ वनडे सामन्यांत १७५० धावा केल्या आहेत. यात त्याच्या खात्यात ५ शतके आणि ८ अर्धशतकांची नोंद आहे. त्याचा हा विक्रम मागे टाकण्याची विराट कोहलीला संधी आहे.
विराट कोहली हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडेत ३१ सामन्यांत ६ शतकाच्या मदतीने १६५७ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढण्यासाठी त्याला फक्त ९४ धावांची गरज आहे. एका मोठ्या खेळीसह तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरू शकतो. न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा रॉस टेलर याने केल्या आहेत. त्याने ३५ सामन्यांत १३८५ धावा केल्या आहेत. तर केन विल्यमसनने ३१ सामन्यांत १२३९ धावा केल्या आहेत.
विराट कोहली करिअरच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये
टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फक्त वनडेवर फोकस करणारा विराट कोहली सध्या सातत्यपूर्ण धमाकेदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. मागील वर्षी विराटने वनडेत १३ डावात ६५.१० च्या सरासरीसह ३ शतके आणि ४ अर्धशतकांचा मदतीने ६५१ धावा केल्या. नव्या वर्षात तो यापेक्षा मोठा धमाका करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संभाव्य संघ :
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, जॅक फॉल्क्स, मिच हे, काइल जेमिसन, निक केली, जेडेन लेनोक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग.
आजचा सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड
वेळ : दु. १.३० वा.
स्थळ : बीसीए स्टेडियम, कोटंबी, वडोदरा
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार