‘कोस्टल ओडिसी’ स्पर्धेत दीपिका राणाची बाजी

मिलिंद सोमणसह दिग्गज जलतरणपटूंचा सहभाग

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
16 mins ago
‘कोस्टल ओडिसी’ स्पर्धेत दीपिका राणाची बाजी

पणजी : दक्षिण गोव्याच्या अथांग समुद्रात गोवा ओपन वॉटर स्विमिंग क्लबतर्फे (जीओडब्ल्यूएससी) आयोजित करण्यात आलेल्या ‘डिलिव्हरी कोस्टल ओडिसी’ या स्पर्धेत बंगळुरूच्या दीपिका राणाने ऐतिहासिक यश संपादन केले. दीपिकाने व्हॅलर ते झॅलोर या समुद्रकिनाऱ्यांदरम्यानचे २० किमीचे आव्हानात्मक अंतर ९ तास १२ मिनिटांत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत जलतरणपटूंच्या क्षमतेनुसार तीन प्रमुख प्रकार ठेवण्यात आले होते. सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या २० किमी सोलो या प्रकारात दीपिका राणा सर्व सोलो आणि रिले जलतरणपटूंमध्ये अव्वल ठरली. १० किमी x २ रिलेमधील दोन सदस्यांच्या संघात प्रत्येकाने १० किमी अंतर कापले. तर ५ किमी x ४ रिलेमधील चार सदस्यांच्या संघात प्रत्येकाने ५ किमी अंतर पार केले.


दिग्गज जलतरणपटूंची मांदियाळी
या स्पर्धेत गोवा, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथील एकूण २० जलतरणपटूंनी सहभाग घेतला. यामध्ये अनेक नामांकित व्यक्तींचा समावेश होता. प्रसिद्ध आयर्नमॅन ट्रायथलिट मिलिंद सोमण यांनी २० किमी सोलो शर्यतीत भाग घेतला. त्यांच्या पत्नी अंकिता कोंवर यांनी १० किमी रिले प्रकारात सहभाग नोंदवला. तर मुंबईचे इंग्लिश चॅनेल रिले जलतरणपटू झरीर बालीवाला आणि स्विम लाइफ बंगळुरू क्लबचे अनुभवी प्रशिक्षक सतीश माटा यांच्यासह तेजस साटी, डॉ. संतोष अशा अनेक दिग्गजांनी आपली छाप पाडली.
जीओडब्ल्यूएससीचे सह-संस्थापक एलियास पटेल यांनी या स्पर्धेचे महत्त्व विशद करताना सांगितले की, कोस्टल ओडिसी ही केवळ शर्यत नसून जलतरणपटूंच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची कसोटी आहे. समुद्रातील प्रवाह, वारे आणि समुद्री जीवांचा सामना करत ही शर्यत पूर्ण करणे हे मोठे आव्हान असते. या यशस्वी आयोजनासाठी गोवा पर्यटन, दृष्टी मरीन आणि युनिव्हेड यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्थानिकांचे देदीप्यमान यश
स्थानिक गोमंतकीय स्पर्धकांनीही या स्पर्धेत चुरस निर्माण केली. पणजी येथील कायद्याचे प्राध्यापक आमोद शिराळी यांनी २० किमीची खडतर शर्यत पूर्ण केली. माजी राष्ट्रीय जलतरण विजेती जस्टीन मेलोकास्त्रो हिने १५ वर्षांनंतर स्पर्धेत पुनरागमन करत अश्विन दळवी यांच्यासोबत ४ x ५ किमी रिले प्रकारात सहभाग घेतला.