न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

श्रेयस अय्यरचे पुनरागमन : मात्र खेळ मेडिकल टीमच्या परवानगीनंतरच

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd January, 11:07 pm
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : नवीन वर्षातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले असून, मात्र त्याचा मालिकेतील प्रत्यक्ष सहभाग बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) येथील वैद्यकीय चमूच्या परवानगीनंतरच निश्चित होणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर बराच काळ मैदानाबाहेर होता. त्यानंतर मानेला झालेल्या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही खेळू शकला नव्हता. मात्र आता तो या दुखापतीतून बऱ्यापैकी सावरला असून, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. तरीही, त्याला खेळण्याची अंतिम परवानगी वैद्यकीय तपासणीनंतरच दिली जाणार असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेसाठी शुभमन गिल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संघात शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले असून, त्यांनी तिलक वर्मा, ध्रुव जुरेल आणि ऋतुराज गायकवाड यांची जागा घेतली आहे. अनुभव आणि युवा जोश यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न निवड समितीने केल्याचे दिसून येते.
न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाची मालिका
न्यूझीलंडविरुद्धची ही वनडे मालिका भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर संघ संयोजन, मधल्या फळीतील स्थैर्य आणि गोलंदाजी आक्रमणाची चाचणी या मालिकेत होणार आहे. विशेषतः श्रेयस अय्यर तंदुरुस्त ठरल्यास मधल्या फळीत भारतीय संघाला मोठी ताकद मिळू शकते.
ऋतुराज गायकवाडला डच्चू
श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे ऋतुराजला गायकवाडला वगळण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले. गायकवाड दुर्दैवी ठरला. कारण शतकी खेळी केल्यानंतरही त्याला संघातून वगळण्यात आले. टीम इंडियाने संघात तीन अष्टपैलू, चार जलद गोलंदाज, दोन यष्टीरक्षक आणि सहा फलंदाजांचा समावेश केला आहे.
रोहित-विराट फॉर्मात; चाहत्यांच्या नजरा दिग्गजांवर
भारतीय संघाचे दोन मोठे आधारस्तंभ रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत आपले कौशल्य दाखवण्यास सज्ज आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीने सलग दोन शतके झळकावत ३०२ धावा कुटल्या होत्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दुसरीकडे रोहित शर्मानेही दोन अर्धशतके झळकावून आपला फॉर्म सिद्ध केला आहे. या दोघांकडून न्यूझीलंडविरुद्धही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. या मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान न मिळाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी बीसीसीआयवर प्रश्नांचा भडिमार केला आहे.ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रायपूर वनडे सामन्यात १०५ धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर विशाखापट्टणम वनडेमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि आता थेट त्याला संघातूनच वगळण्यात आले आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऋतुराज जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तराखंडविरुद्ध १२४ धावा आणि मुंबईविरुद्ध ६६ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला डावलल्याने चाहते संताप व्यक्त करत आहेत.निवड समितीने केवळ ऋतुराजलाच नव्हे, तर इतर चार महत्त्वाच्या खेळाडूंनाही संधी नाकारली आहे. ज्या दिवशी भारतीय संघाची निवड झाली, त्याच दिवशी अक्षर पटेलने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार शतक झळकावले, तरीही त्याला संघात स्थान मिळाले नाही. दक्षिण आफ्रिकेत टी-२० मध्ये चमकलेल्या तिलक वर्मानेही निवडीच्या दिवशी शतक ठोकले, मात्र त्यालाही वनडे संघातून वगळण्यात आले आहे. चाहत्यांचा लाडका संजू सॅमसन यानेही शतकी खेळी करून आपली दावेदारी ठोकली होती, पण त्याच्या नावाचा विचार झाला नाही. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेत पुनरागमन करेल अशा चर्चा होत्या, मात्र त्या केवळ अफवा ठरल्या असून त्यालाही संघात स्थान मिळालेले नाही.
सोशल मीडियावर टीकेची झोड
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमी प्रचंड नाराज आहेत. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान का मिळत नाही? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. अनेक चाहत्यांनी बोर्डाला ‘पक्षपाती’ म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
सर्वांचे लक्ष श्रेयसच्या फिटनेसकडे
श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त ठरतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे आणि संघ व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे. वैद्यकीय चमूचा हिरवी झेंडा मिळाल्यास, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा भारतीय जर्सीत मैदानात उतरताना दिसू शकतो.