सिडनी कसोटीत ज्याे रूटचे ४१वे विक्रमी शतक

ॲशेस २०२५–२६ : पाँटिंगची केली बरोबरी, इंग्लंड सर्वबाद ३८४

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th January, 11:25 pm
सिडनी कसोटीत ज्याे रूटचे ४१वे विक्रमी शतक

सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस २०२५–२६ मालिकेतील पाचवा व शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज ज्यो रूट याने दमदार फलंदाजी करत कसोटी कारकिर्दीतील ४१वे शतक झळकावले. रूटने २४२ चेंडूंमध्ये १६० धावांची शानदार खेळी केली.
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस व खराब प्रकाशामुळे केवळ ४५ षटकांचा खेळ होऊ शकला होता. त्या दिवशी रूट ७२ धावांवर नाबाद राहिला होता. दुसऱ्या दिवशी त्याने केवळ १४६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या ॲशेस मालिकेतील रूटचे हे दुसरे शतक ठरले.
या शतकासह जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या बरोबरीने पोहोचला आहे. दोघांच्या नावावर आता प्रत्येकी ४१ कसोटी शतके आहेत. विशेष म्हणजे, रूटने ही कामगिरी आपल्या १६३व्या कसोटी सामन्यात साध्य केली, तर पॉन्टिंगने १६८ कसोटी सामने खेळले होते. या यादीत आता फक्त सचिन तेंडुलकर (५१ शतके) आणि जॅक कॅलिस (४५ शतके) हे दोनच फलंदाज रूटच्या पुढे आहेत.
दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ३ बाद २११ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ३८४ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला.
२०२१ सालापासून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रूट अव्वल स्थानावर आहे. या कालावधीत त्याने आतापर्यंत २४ कसोटी शतके झळकावली आहेत. त्याच्यानंतर स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन, हॅरी ब्रूक आणि शुभमन गिल हे प्रत्येकी १० शतकांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियातील दुसरे कसोटी शतक
या ॲशेस मालिकेपूर्वी रूटच्या नावावर ऑस्ट्रेलियात एकही कसोटी शतक नव्हते. मात्र, या मालिकेत त्याने ही कसर भरून काढली. गाबा मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने पहिल्या डावात १३८ धावा केल्या होत्या. आता सिडनी कसोटीत शतक झळकावत त्याने ऑस्ट्रेलियातील आपले दुसरे कसोटी शतक पूर्ण केले आहे.
पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस व खराब प्रकाशामुळे खेळावर मोठा परिणाम झाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिवसअखेर इंग्लंडने ३ गडी गमावून २११ धावा केल्या होत्या. जो रूट (७२) आणि हॅरी ब्रूक (७८) नाबाद राहिले होते. दोघांमध्ये १५४ धावांची नाबाद भागीदारी झाली होती. सिडनी कसोटीत जो रूटच्या या ऐतिहासिक खेळीमुळे इंग्लंडला भक्कम धावसंख्या उभारता आली असून, ॲशेस मालिकेतील हा सामना अधिकच रंगतदार बनला आहे.