कगिसो रबाडाने हिसकावला बुमराहचा ‘नंबर वन’चा मुकूट!

आयसीसी टेस्ट रँ​किंग : यशस्वी जैस्वालची टॉप ३ मध्ये एंट्री

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
30th October 2024, 11:32 pm
कगिसो रबाडाने हिसकावला बुमराहचा ‘नंबर वन’चा मुकूट!

दुबई : आयसीसी नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी या क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर आयसीसी क्रमवारीत बड्या खेळाडूंची लक्षणीय घसरण झाली आहे. जसप्रीत बुमराहने आपले अव्वल स्थान गमावले असून द. आफ्रिकेच्या कसिगो रबाडाने त्याला मागे टाकले आहे. फलंदाजीत टीम इंडियाचा फक्त एकच खेळाडू टॉप १० मध्ये उरला आहे. बाकी सगळ्यांची मोठ्या फरकाने घसरण झाली आहे.
ताज्या क्रमवारीनुसार बुमराहने कसोटीतील नंबर १ गोलंदाजाचा ताज गमावला आहे. कागिसो रबाडाने त्याच्या पहिल्या स्थानाचा मुकूट हिसकावला आहे. रबाडा आता कसोटीतील नंबर वन गोलंदाज बनला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमधील रबाडाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बुमराह, ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि भारताचा रविचंद्रन अश्विन यांना मागे सोडून रबाडा २०१९ नंतर प्रथमच क्रमांक १ वर पोहोचला आहे. रबाडा जानेवारी २०१८ मध्ये प्रथम अव्वल स्थानी पोहोचला होता. तेव्हापासून तो सतत टॉप १० मध्ये राहिला आहे. सध्याच्या क्रमवारीत हेजलवूड दुसऱ्या स्थानावर आहे, तर बुमराह आणि अश्विन अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
बुमराहची न्यूझीलंडविरुद्ध खराब कामगिरी
बुमराहने अलीकडेच बांगलादेश मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर कसोटीत पुन्हा अव्वल स्थान मिळवले होतो. या मालिकेत त्याने अश्विनसह ११ विकेट घेतल्या होत्या. परंतु ही जोडी न्यूझीलंडविरुद्ध चालू असलेल्या मालिकेत चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरली. दोघांनी ४० पेक्षा जास्त सरासरीने अनुक्रमे केवळ तीन आणि सहा विकेट्स घेतल्या.
ज्यो रूट पहिल्या क्रमांकावर कायम
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रूट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग ९०३ झाले आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८१३ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दरम्यान चांगली गोष्ट म्हणजे भारताची सलामीवीर यशस्वी जैस्वाल आता एका स्थानाच्या झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी ठरली आहे. त्याचे रेटिंग आता ७९० आहे.

फलंदाजांमध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ७७ (६५) धावांच्या वेगवान खेळीनंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडचा रचिन रवींद्रही आठ स्थानांनी प्रगती करत १०व्या स्थानावर पोहोचला आहे. दोघांनीही कारकिर्दीत प्रथमच पहिल्या १० मध्ये प्रवेश केला आहे. टॉप १० कसोटी फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
ऋषभ पंत आणि विराट कोहलीची घसरण
ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची ५ स्थानांनी घसरण झाली आहे. आता तो टॉप १० मधून बाहेर पडून थेट ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध खराब कामगिरीनंतर विराट कोहलीचीही एका झटक्यात ६ स्थानांनी घसरण झाली आहे. त्याला टॉप १० मधून बाहेर पडावे लागले आहे. विराट आता ६८८ च्या रेटिंगसह १४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.