गोव्याचा चंदीगडवर एक डाव, ७५ धावांनी ऐतिहासिक विजय

अर्जुन आझादचे शतक वाया : अष्टपैलू ललीत यादव सामनावीर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th October, 11:37 pm
गोव्याचा चंदीगडवर एक डाव, ७५ धावांनी ऐतिहासिक विजय

पणजी : रणजी ट्रॉफीच्या २०२५-२६ हंगामातील एलिट ग्रुप बीच्या पहिल्या फेरीत गोव्याच्या संघाने चंदीगडवर एक डाव व ७५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. गोवा क्रिकेट अकॅडमी, पर्वरीच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात गोवा संघाने उल्लेखनीय कामगिरी केली.
गोवा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात १६०.४ षटकांत ५६६ धावा फटकावल्या. ललित यादवने २१३ धावांची भव्य खेळी साकारली, तर अभिनव तेजरानाने २०५ धावा करत द्विशतक झळकावले. दोघांनी मिळून चंदीगडच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. चंदीगडकडून विशु कश्यपने १७३ धावांत ७ गडी बाद केले.
चंदीगडचा पहिला डाव केवळ १३७ धावांत आटोपला. गोव्याच्या गोलंदाजांनी अचूक आणि आक्रमक माऱ्याने चंदीगडच्या फलंदाजांना संधी दिली नाही. चंदीगडकडून भगमेंदर लाथर याने सर्वाधिक २७ धावा केल्या, तर जगजीत सिंग याने ३१ धावा करत काहीसा प्रतिकार केला. कर्णधार मनन वोहरा याने २३ धावा आणि अर्जुन आझाद याने २१ धावा केल्या. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. गोव्याकडून ललित यादव याने प्रभावी गोलंदाजी करत ३ बळी घेतले. दर्शन मिसाळ यानेही २ बळी, तर अर्जुन तेंडुलकर, हेरंब परब, मोहित रेडकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. राज बावा धावबाद झाला. गोव्याने ४२९ धावांची विशाल आघाडी घेऊन चंदीगडला फॉलोऑन दिला.
दुसऱ्या डावात चंदीगडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिवम भांब्री आपले खाते न उघडता अर्जुन तेंडुलकरचा शिकार ठरला. दर्शन मिसाळने कर्णधार मनन वोहरा याला केवळ १ धावांवर बाद केले. मात्र, अर्जुन आझाद व भगमेंदर लाथर यांनी ८४ धावांची भागीदारी करत थोडी झुंज दिली. लाथर ३८ धावांवर ललित यादवचा शिकार ठरला.
तिसऱ्या दिवशी चंदीगडने काहीसा प्रतिकार केला. अर्जुन आझादने १४१ धावा (१६ चौकार, १ षटकार) करत झुंज दिली, तर अंकित कौशिकने ८२ धावा (१० चौकार, २ षटकार) करत त्याला साथ दिली. राज बावा (३१), अभिषेक सैनी (नाबाद ३३) आणि निशंक भाटिया (१८) यांनीही योगदान दिले. मात्र, दर्शन मिसाळने दुसऱ्या डावात ५ गडी बाद करत चंदीगडचा डाव ९१.४ षटकांत ३५४ धावांत गुंडाळला. मोहित रेडकरने ३ तर अर्जुन तेंडुलकर आणि ललीत यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दर्शन मिसाळ उत्कृष्ट गोलंदाज
गोव्याने एक डाव व ७५ धावांनी विजय मिळवला. ललित यादवला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने २१३ धावा आणि ४ गडी बाद केले. दर्शन मिसाळने सामन्यात एकूण ८ गडी बाद करत स्टार गोलंदाज म्हणून चमक दाखवली. विजेत्या संघाचा जीसीए अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये, उपाध्यक्ष परेश फडते, संयुक्त सचिव अनंत नाईक, कोषाध्यक्ष अब्दुल माजिद यांनी अभिनंदन केले. यावेळी मुख्य प्रशिक्षक मिलाप मेवाडा, सहाय्यक प्रशिक्षक दोडा गणेश उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक
गोवा : पहिला डाव : सर्वबाद ५६६
चंदीगड : पहिला डाव : सर्वबाद १३७, दुसरा डाव : सर्वबाद ३५४ (फॉलोऑन)