आमदाराचे निधन झाले की घटनेतील तरतुदीनुसार सहा महिन्यांच्या कालावधीत पोटनिवडणूक घ्यावी लागते. फोंड्यात १५ एप्रिल २०२६ पर्यंत पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणुका होतील. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर म्हणजे पुढील वर्षी फोंड्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
भंडारी समाजाचेच नव्हेत तर बहुजन समाजाचे नेते व सर्वसामान्यांचे पाठीराखे स्व. रवी नाईक सरत्या मंगळवारी अनंतात विलीन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या गर्दीचा विचार करता त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. साश्रूपूर्ण नयनांनी बुधवारी गोमंतकीयांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. रवी नाईक यांच्या निधनामुळे राज्यातील रवीपर्व संपले आहे.
त्यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघावर कोणाचे वर्चस्व असेल? रवी नाईक यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याबाबतच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्या आणखी बरेच दिवस सुरू राहणार आहेत. त्यांचे पुत्र रितेश व रॉय यांनी रीतसर भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याची रितेश नाईक यांची इच्छा सर्वश्रुत आहे. मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष रितेश नाईक यांनाच उमेदवारी देईल. सरकारला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने रितेश नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय पक्षातील भंडारी समाजाचे नेतेही रितेशच्याच नावाचा आग्रह धरतील. यामुळे भाजपला उमेदवारीसाठी रितेश नाईक यांच्याशिवाय अन्य नावाचा विचार करणे सध्या तरी परवडणारे नाही. फरक इतकाच की विरोधी पक्षांचाही पाठिंबा रितेशला मिळेल काय? आणखी थोड्या दिवसांत या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
स्व. रवी नाईक यांचे सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांशी चांगले संबंध होते. बहुजन समाज वा भंडारी समाजाचे नेते अशीच त्यांची ओळख होती. यामुळे पक्षांतरानंतरही त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर फरक पडला नाही. एकदा पराभव झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीत ते विजयी झालेले आहेत. तसेच आमदार वा मंत्री असोत वा नसोत, ते कायम कार्यकर्त्यांच्या संपर्कात असायचे. कोणीही भेटायला वा कामासाठी गेला तर त्याला चहा पाजल्याशिवाय ते सोडत नसत. चहा पाजण्याची त्यांची पद्धत हे त्यांच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य होते. १९९८ ते १९९९ पर्यंत जेमतेम एक वर्ष ते उत्तर गोव्याचे खासदार होते. संसदेच्या सेंट्रल हॉलच्या कँटीनमध्ये इतर खासदारांना स्वखर्चाने चहा देण्यात ते सर्वात पुढे असायचे. तसेच त्यांचे बोलणे वा भाषणसुद्धा विनोदी स्वरूपाचे असायचे. यामुळे विरोधी कार्यकर्ते वा नेतेसुद्धा त्यांच्यापासून दुरावत नव्हते. त्यांच्या या गुणांमुळे पक्षांतरानंतरही ते राजकारणातून बाजूला फेकले गेले नाहीत. यामुळे त्यांचा वारसा चालवणे हे त्यांच्या मुलासाठीही एक आव्हान ठरणार आहे.
आमदाराचे निधन झाले की घटनेतील तरतुदीनुसार सहा महिन्यांच्या कालावधीत पोटनिवडणूक घ्यावी लागते. फोंड्यात १५ एप्रिल २०२६ पर्यंत पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणुका होतील. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर म्हणजे पुढील वर्षी फोंड्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. एकंदर स्थितीची पाहणी करून निवडणूक आयोग तारीख जाहीर करणार असल्याने तारखेविषयी भाकीत करता येणार नाही. तरीही जेवढी लवकर पोटनिवडणूक होईल, तेवढी भाजपसाठी ती लाभदायक ठरणार आहे. रवी हे लोकनेते होते. सर्व पक्षांत त्यांचे चाहते होते. यामुळे फोंडा मतदारसंघात सहानुभूतीची लाट आहे. ही सहानुभूती भाजपसाठी मदतगार ठरणार आहे. केवळ २०१२ ची निवडणूक सोडली तर रवी नाईक यांनी १९९९ नंतरच्या फोंड्यातील सर्व निवडणुका जिंकलेल्या आहेत. पहिल्या निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकल्या, तर शेवटची भाजपच्या उमेदवारीवर जिंकली. २००२ साली निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तरीही फोंडा मतदारसंघात त्यांनी थोड्याच मतांनी भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना धूळ चारली होती. भारतीय जनता पक्षाची ताकद १९९० नंतर राज्यात सर्वत्र वाढत गेली. तरीही फोंडा मतदारसंघ जिंकणे भाजपला कधीच शक्य झाले नाही. २०२२ च्या निवडणुकीत रवी नाईक यांच्यामुळेच भाजपला फोंडा मतदारसंघावर झेंडा रोवता आला. रवींमुळेच फोंडा काबीज करणे शक्य झाल्याने त्यांना मंत्रिपद द्यावे लागले. मंत्रिमंडळ फेरबदलावेळी त्यांच्या मंत्रिपदाला हात लावण्याचे धैर्य मुख्यमंत्र्यांना झाले नाही. रवींच्या अस्तानंतर फोंडा मतदारसंघ ताब्यात ठेवणे शक्य होईल का? याबद्दल औत्सुक्य आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर २०१९ मध्ये पणजीत पोटनिवडणूक झाली होती. पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात विजयी झाले होते. पणजी मतदारसंघात स्व. पर्रीकर सतत विजयी झालेले आहेत. तरीसुद्धा त्यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला होता. हा इतिहास ताजा आहे. यामुळे फोंडा पोटनिवडणुकीबाबतही भाजपला गाफील राहता येणार नाही. तसेच मागील निवडणुकीत रवी नाईक यांचा विजय फार कमी मताधिक्याने झालेला आहे. फक्त मागच्या वेळी मगोचा उमेदवार विरोधात होता. यावेळी मगोचा उमेदवार असणार नाही.
फोंड्यात आणखी काही महिन्यांनी पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघेल. एकाच मतदारसंघात निवडणूक होणार असल्याने राज्यभरातील कार्यकर्ते प्रचार करतील. राष्ट्रीय नेतेसुद्धा प्रचारसभा घेतील. यामुळे फोंड्यातील पोटनिवडणुकीला संपूर्ण राज्याच्या निवडणुकीएवढे महत्त्व प्राप्त होणार आहे. आजपर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी उमेदवार ठेवलेला आहे. यामुळे रितेशला उमेदवारी दिली तरी बिनविरोध निवड होण्याची शक्यता धूसर आहे. सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकच उमेदवार उभा केला तर गड राखण्यासाठी भाजपला शर्थ करावी लागणार आहे. फोंडा पोटनिवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
गणेश जावडेकर
(लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)