लोकवेदातील श्रावणबाळ

रामायणातील श्रावणबाळ आपल्या मातृ-पितृ भक्तीमुळे अमर झाला. राजा दशरथाच्या वंशउद्धाराचे निमित्त ठरला. पण या नशिबाच्या खेळामध्ये वृद्ध आई-वडिलांना आपला एकुलता एक बाळ गमवावा लागला. त्यांचे हे दुःख घरणीबाईने सुद्धा जाणले. अनुभवले आणि आपल्या ओव्यांमधून ते व्यक्त केले. रामायणामध्ये श्रवणबाळ म्हणून ओळखला जाणारा हा बाळ आपल्या लोकवेदात मात्र श्रावण या नावाने जाणला जातो.

Story: भरजरी |
7 hours ago
लोकवेदातील श्रावणबाळ

श्रावणबाळाची कथा ही पुराणात वेगळी असली, तरी लोककथा म्हणून ती एक वेगळी किनार घेऊन येते. या लोककथेतील श्रावणबाळाची माता गिरिजावंती आणि पिता ईदवान, या पुण्यश्लोकी दांपत्याच्या पोटी श्रावण नावाचा गुणवंत बाळ जन्माला. आई-बाबांची सेवा करणे हाच त्याने आपला धर्म मानला होता. आई-बाप डोळ्यांनी आंधळे आणि पायाने पांगळे असल्यामुळे ते पूर्णतः श्रावणबाळावर अवलंबून होते. 

श्रावणबाळाच्या मातापित्याला एके दिवशी तीर्थयात्रा करावी असे वाटले. आपण आपल्या बाळावर पूर्णतः अवलंबून आहोत याची मातापित्याला पूर्ण जाणीव होती. पण तरीही त्यांनी आपल्या मनातील इच्छा श्रावणाला बोलून दाखवली. 

गिरिजावंती माता गे ईदवान पिता
त्यांच्या गे पोटी गे श्रावणबाळ
श्रावणाच्या आई बापा तीर्थ आठवली
अरेरे श्रावणबाळा
आमका काशीक वर रे

आपल्या आई-वडिलांनी कधीच आपल्याकडे कोणतीही मागणी केली नाही. पण आज ते दोघे काशीला जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांची ही इच्छा आपण पूर्ण करावी असा ध्यास श्रावणबाळाने घेतला. पण आई-वडील पायाने पांगळे आणि डोळ्याने आंधळे होते. त्यामुळे आपल्या मातापित्याला कसे बरे काशीला न्यावे याचा विचार करत असताना श्रावणबाळाला एक उपाय सुचला.

श्रावणाचे आई बाप्पा
पायान पांगळे
पायान पांगळे गे डोळ्यांन आंधळे
त्यांचा घे तीर्थ आठवणी
खाणार घेतल्यावर कोलासानी
गेलो गे चंदन बना
चंदनाचा मुन पालथायता
मुरार ठेविले तिळ काय तांदूळ
उगवते मोरेक चंदन पाडीलो
दोन काढल्या फळी या
दोन काढल्या दांडिया
अरेरे गोयातल्या सुतारा
आमचा रे कावड घडवोन दि रे 

श्रावणबाळ जंगलात गेला. एक चांगलेसे चंदनाचे झाड शोधले.  पहाटेच्या वेळेला चंदन झाडाची तीळ, तांदूळ ठेवून पूजा केली, झाड कापले. झाडाचे दोन फळ्या आणि दोन दांड्या होतील एवढेच लाकूड घेतले. ते लाकूड सुताराकडे नेऊन दिले. लाकडापासून कावड तयार करण्याची विनंती त्याने सुताराला केली. या कावडीत बसवून आपल्या पांगळ्या माता-पित्याला काशी यात्रेला आपण घेऊन जाऊ शकतो याची खात्री श्रावणबाळाला झाली. 

श्रावणबाळ कावड घेऊन घरी आला. पिकावर तुळशी वृंदावनापुढे ठेवली. मातापित्याला कावडीत बसवले. आपल्या मुलाने आपली इच्छा व्यक्त करण्याकरिता एवढे कष्ट घेतले याचे आई-वडिलांना वाईट वाटले. पण श्रावणबाळाला मात्र असीम आनंद होत होता की तो आपल्या आई-वडिलांची इच्छा आता पूर्ण करू शकणार आहे. आई-वडील कावडीत बसताच श्रावणबाळाला जाणीव झाली की आपल्या आई-वडिलांचा भार एकसारखा नाही, त्यामुळे कावड वर खाली होते. 

श्रावणबाळांन कावड हाडली
हाडून ठेयली तुळशी वृंदावना
श्रावणाचे आईबाप सासपान पाईत
अरेरे श्रावणबाळा
तुका का आम्ही काय बहु तरास दिलो
माते काय पित्याची कावड खान्याक लाईली
पित्याला नाही रे भार माते काय जास्ती ते भार
काडी लो गळ्यातलो हार
नवलक्ष हार काय कावडीन घातलो 

पित्याची कावड वजनाने हलकी आणि मातेची कावड वजनाने भारी यामुळे श्रावणबाळाला कावड न्यायला अवघड होऊ लागले. या ओळीमागचा मतितार्थ असा की मुलगा कर्ता पुरुष झाला की वडिलाला आपला भार कमी झाल्यासारखे वाटते. मात्र आपल्या मुलाला त्रास झाला की वयाच्या कुठल्याही पायरीवर असेना, मातेचे हृदय मुलाचा त्रास पाहून दुःखाने भारी होते. इथेही पित्याची कावड हलकी तर मातेची कावड जड वाटू लागली. अशावेळी मातेने आपल्या गळ्यातील नवरत्नाचा हार म्हणजेच आपल्या जवळचे सत्व आपल्या नवऱ्याच्या कावडीत घातले आणि कावड बरोबरीची झाली. 

सूर्याक केलो नमस्कार
कावड लायली खान्यावर
श्रावणबाळ  काय चला लागलो
चलता बोलता वळख करू लागला
गुणे काय माणे माणूक लागलो

आई-वडिलांना कावडीत बसवून सूर्य देवाला नमस्कार करून भल्या पहाटे कावड खांद्यावर लावून श्रावणबाळ काशी यात्रेची वाट चालू लागला. वाट जंगलातून जाणारी होती त्यामुळे परतीची वाट सहज सापडावी म्हणून तो वाटेत ठिकठिकाणी दगड रचून ठेवून ओळख खूण सोडू लागला. पण मातृ-पितृ भक्त श्रावणबाळाला नियतीचा खेळ कुठे माहीत होता? 

कावड घेऊन चालत श्रावणबाळ जंगलाची वाट तुडवू लागला. काशी जवळ करू लागला. श्रावणाच्या मातापित्याला तहान लागली. त्यांनी  श्रावणबाळाला तसे सांगितले. आपल्या आई-वडिलांची तहान भागवण्याकरिता श्रावणबाळाने तिथे जवळच असलेल्या एका चिंचेला कावड अडकवली आणि तो पाणी आणायला जवळच्या तळ्यावर गेला.

अरेरे श्रावणबाळा
आमका काय तान लागली
कावड राहिली गुरखे चिंचे
गेलो गे एकानी तळ्यार
दशरथ राजा बारा वर्षा राखा गे तळा
बुडबुडा आवाजार बाण सोडिलो
बाळाच्या खंजिऱ्या गेलो
अरेरे दशरथा मामा
माझे काय आईबाप तानेन तानेले 

श्रावणबाळ  कमंडलूमध्ये पाणी भरत असताना बुडूबुडू असा आवाज होऊ लागला. तळ्याच्या पलीकडे राजा एका झाडावर बसून सावजाची वाट पाहत होता. कमंडलूमध्ये पाणी जाताना होणारा बुडबुड आवाज ऐकून राजा दशरथाला वाटले की कोणीतरी सावज पाणी पीत असावे. ध्वनीवेदात पारंगत असलेल्या राजा दशरथाने आवाजाच्या दिशेने बाण फेकला. तो बाण अचूक श्रावणाच्या छातीत घुसला. श्रावणबाळ वेदनेने विव्हळला. माणसाचा आवाज ऐकताच राजा दशरथही घाबराघुबरा झाला. खाली येऊन बघताच आपल्या हातून कोणते घोर पाप झाले आहे याची जाणीव राजा दशरथाला झाली. पण आता पश्चाताप करून काहीही फायदा नव्हता. श्रावणबाळ  मरणाच्या दारात उभा होता. या अशा मरणासन्न अवस्थेतही श्रावणबाळाला आपल्या तहानलेल्या आई-वडिलांची आठवण येत होती. या लोकगीतामध्ये राजा दशरथ श्रावणबाळाचा नात्याने मामा लागतो. श्रावणबाळाने मोठ्या मनाने राजा दशरथ म्हणजेच आपल्या मामाला माफ केले आणि आपल्या आई-वडिलांना पाणी पाजा ते तहानलेले आहेत अशी आपली शेवटची इच्छा व्यक्त करत प्राण सोडले. 

राजा दशरथ दुःखी अंतःकरणाने आणि खाल मानेने कावडीजवळ आला. श्रावणबाळाचे माता पिता तेथे श्रावणबाळाची वाट पाहत होते. मुक्यानेच राजा दशरथाने श्रावणाच्या मातेकडे पाण्याचा कमंडलू दिला कारण आपण बोललो तर आपण श्रावणबाळ नाही हे ते माता-पिता ओळखतील आणि आपल्या हातचे पाणी सुद्धा घेणार नाहीत. त्यामुळे श्रावणाची आपण शेवटची इच्छा पूर्ण करू शकणार नाही अशी भीती राजा दशरथाला होती. पण मुक्याने पाणी देत आहे म्हणजे श्रावणाला आपला राग आला की काय? त्याला आपण ओझे वाटतो की काय अशी चिंता आईला वाटू लागली. त्यामुळे जोपर्यंत तू आमच्याशी संवाद साधत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही असा श्रावणाच्या आई-वडिलांनी हट्ट धरला. शेवटी राजा दशरथाला आपले मौन सोडावे लागले.

कावड राहिल्या गुरखा चिंचे
त्यांका काय पाणी पाजोवन रे
श्रावणबाळानं पराण सोडलो
दशरथ राजा घे पाणी घेऊन गेलो
अरेरे श्रावणबाळा
तिया रे बोला ने किद्या
आम्ही रे तू का बहु तरास केलं
दशरथ राजा का रडा लागलं
तुझा काय पाणी काय आम्हा नको
दशरथ राजानं वाचा फोडली 

राजा दशरथ दुःखी अंतकरणाने आपण तुझा भाऊ दशरथ असल्याचे सांगितले आणि नंतर तळ्याकाठी जे काही घडले ते सांगू लागला. गेली बारा वर्षे मी माझ्या गुरुच्या सांगण्यानुसार तळे राखत होतो. पण बारा वर्षात आज तिथे मला बुडूबुडू असा आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणजे एखाद्या श्वापदाचा आवाज असेल असे वाटल्या कारणाने मी आवाजाच्या दिशेने सोडलेला बाण श्रावणबाळाला लागला आणि त्यातच त्याने प्राण सोडला.

मीया गे तुजो गे बंधू
बारा वर्षे राखा गे तळा
बुडबुड आवाज येयेलो
सुखणा सावाज म्हणान बाण सोडलो
अरेरे दशरथ बनवा
माज्या काय बाळाचो अपघात केलो
माते काय पित्याने पराण सोडीलो
एकाचा मरण तिघांचा मरण 

आपल्या बाळाचा मृत्यू झाला हे ऐकताच आंधळे माता पिता शोक करू लागले. ज्याप्रमाणे आपल्या ह्या उतारवयात तुझ्यामुळे आमचे लेकरू आमच्यापासून दूर झाले तसेच तुझ्याही उतारवयात तुझे मुलगे तुझ्यापासून दूर होतील असा शाप देत श्रावणबाळाच्या मात्यापित्याने प्राण त्याग केला. राजा दशरथाच्या चुकीमुळे फक्त एकट्या श्रावणबाळाचा प्राण गेला नाही, तर त्याच्याबरोबर त्याचे आई-वडील अशा तिघांचा प्राण एका चुकीमुळे गेला. जाता जाता ते सत्वशील आई-वडील राजा दशरथाला शाप देऊन गेले की तुझ्या उतारवयात तू सुद्धा याच दुःखाला सामोरा जाशील. मात्र हा शाप राजा दशरथासाठी वरदान ठरला कारण याच शापामुळे निपुत्रिक राजा दशरथला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशा गुणी मुलांचा पिता होण्याचे सौख्य लाभले. आणि पुढे रामायणात आपल्या प्रिय पुत्र रामाच्या विरहाने कशाप्रकारे राजा दशरथाचा अंत होतो हे सर्वज्ञात आहे.

झाला गे झाला सयानो 
फुगडी घाला बायांनो 

या गोष्टीकडे रामायणाची गोष्ट म्हणून पहा किंवा लोकगीतातील गोष्ट म्हणून. दोन्हीकडे समानता हीच आहे की आपण नियतीच्या हातचे बाहुले आहोत. ती ज्याप्रमाणे आम्हाला नाचवते त्याप्रमाणेच आपण नाचत असतो. म्हणूनच आपल्या आयुष्यात जी प्रत्येक चांगली-वाईट होत असते ती विधीलिखित असते असे मानले जाते.


गाैतमी चाेर्लेकर गावस