मुख्यमंत्री कसा असावा असा प्रश्न कोणी विचारला तर रवी नाईक यांच्यासारखा असे उत्तर मी देईन. मुक्तिनंतर अनेक मुख्यमंत्री गोव्यात होऊन गेले. त्यात दुर्जनांचे कर्दनकाळ आणि सज्जनांचे आधार असलेले लोकनेते रवी नाईक यांना सादर प्रणाम!
कोंकणी राजभाषा आंदोलनाच्या नावाखाली सासष्टी तालुक्यातील काही निवडक गावांमध्ये गुंडांनी दहशत माजवली होती. जिलेटीनचा वापर करून नुवे येथे राष्ट्रीय हमरस्त्यावरील सांकव/पूल उडवला होता. कुठ्ठाळी ते नुवे दरम्यानच्या हमरस्त्यावर किमान १०० झाडांचा खच पडला होता. तब्बल तीन दिवस मडगाव-पणजी मार्गावरील सार्वजनिक वाहतूक बंद होती. रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी पोलीस किंवा अग्निशामक दलाचे जवान तयार नव्हते.
कारण खाकी युनिफॉर्ममधील पोलिसांना आपल्या जीवाची भीती वाटत होती. राजभाषा आंदोलनाची हाक देणाऱ्या कोंकणी प्रजेच्या आवाजाचे नेते भूमिगत झाले होते. सासष्टीत जी जाळपोळ, मोडतोड, दंडेलशाही चालली होती ती त्यांना मान्य नव्हती. पण त्याविरुद्ध ब्र काढण्याची धमक नव्हती. कारण केवळ कोंकणीच राज्यभाषा करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रजेचो आवाज नेत्यांनीच हा भस्मासूर निर्माण केला होता. या नेत्यांनी तोंड उघडले असते तर त्यांचे भस्म केले असते. त्यामुळे तोंडात गुळण्या घेऊन चादरीत तोंड लपवून भूमिगत राहणेच त्यांनी पसंत केले.
घोगळ येथे झालेल्या आंदोलनात एका निष्पाप युवकाचा बळी गेला की या रक्तपिपासू लोकांनी बळी दिला हे शेवटपर्यंत कळलेच नाही. या प्रकरणाने नेसाय भागातील दोन व्यापारी आस्थापनांची राखरांगोळी करण्यात आली. मडगाव बाजारपेठ उघडण्याचे धाडस कोणालाच होत नव्हते. गोव्यात सरकार नावाची चीज आहे की काय हा प्रश्न सासष्टी वगळता उरलेल्या १० तालुक्यातील लोकांना पडला होता.
सासष्टी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था साफ कोलमडलेली असताना आणि पोलीस दल हतबल झालेले असताना आम्ही काही पत्रकार पणजी सचिवालयातील प्रेस रुममध्ये बसलो होतो. त्या काळात मोबाईल फोनचा उदय झाला नव्हता. एवढ्यात प्रेसरुममधील फोन वाजला आणि गुरुदास आसा? अशी फोनवरील माणसाने विचारणा केली. मी फोन घेतला तर समोर रवी बोलत होते. पत्रकारांना घेऊन फोंड्याला ये, मी तुम्हाला मडगावला नेतो असे रवी यांनी सांगितले. मडगावला काय चाललंय ते पाहण्याची उत्सुकता होतीच पण सेक्युरिटीचे काय? नकळत मी विचारले. मी आहे असे म्हणत रवी यांनी मला आश्वस्त केले. त्यामुळे आम्ही ४-५ पत्रकारांनी फोंडा गाठला. त्यांनी एका जीपची व्यवस्था केली होती. ड्रायव्हरच्या बाजूला मला बसवून रवी खिडकीजवळ बसले. खिशातील पिस्तूल काढून मला दाखवून आपल्या मांडीवर ठेवले आणि भिवपाची गरज ना असे माझ्या कानात कुजबुजले. अलिकडील काळात भिवपाची गरज ना असे जेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात तेव्हा मला रवी नाईक यांची आपसूक आठवण येते.
रवी नाईक यांच्या वैयक्तिक सुरक्षाकवचाखाली आम्ही बोरी मार्गे मडगावकडे प्रयाण केले. बोरी पूल ओलांडून कामुर्ली गावात प्रवेश केला. तेथून पुढे राय, आर्ले, बोर्डे असा प्रवास करत मडगाव पोलीस ठाणे गाठले. तेथील उपाधिक्षकाला भेटलो.
तेव्हा जीव धोक्यात घालून पत्रकारांना मडगावला आणल्याबद्दल रवी नाईक यांना सुनावले. गुंडांना घाबरून पोलिसांनी पळपुटेपणा केल्याने आपल्याला हे धाडस करावे लागले. थोडी लाज लज्जा असेल तर व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊन दुकाने उघडण्याचे आवाहन करा असे म्हणत पोलीसदलाची खरडपट्टी काढली. आपण विरोधी पक्षांचा साधा आमदार असूनही स्वबळावर मडगावला येऊन लोकांना भेटतो तर गोवा पोलिसांनी बाणावलीच्या छोट्या छोट्या गुंडांना घाबरून गप्प बसणे शोभते काय असा सवाल केला. पत्रकारांसमक्ष झालेली ही कानउघडणी डीव्हाय एसपीची मान शरमेने खाली गेली पण लगेच त्यांनी कारवाई चालू केली. बिनतारी यंत्रणेने किंग -१ शी संपर्क साधून पोलीसदलाला सतर्क केले. शहरात पोलीस कार्यरत झाल्यावर बाजार हळूहळू उघडा होत गेला. गोव्याचे गृहमंत्री ५-६ दिवस जे करु शकले नव्हते ते विरोधी पक्षाच्या एका साध्यासुध्या आमदाराने करुन दाखवले होते. त्यानंतर आम्ही ज्यांचे नुकसान झाले होते त्यांची भेट घेतली. त्यांना दिलासा दिला. रवी नाईक पत्रकारांसोबत मडगावला येऊन गेल्याचे वृत्त दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात सचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा गुंडगिरी संपली. जे काम गोव्याच्या गृहमंत्र्यांनी करायला हवे होते ते काम फोंडा तालुक्यातील एका विरोधी पक्ष आमदाराने केले होते. याला म्हणतात नेतृत्व!
रवी याचे हे नेतृत्व १९९० मध्ये परत एकदा यशस्वी, यशवंत ठरले. डॉ. लुईस प्रोत बार्बोझा यांचे पुलोआ सरकार अल्पावधीतच कोसळल्यानंतर मगो आमदारांनी बैठक घेऊन रमाकांत खलप यांची मगो पक्ष विधीमंडळ नेतेपदी निवड केली व त्यांनी नवे सरकार बनविण्यासाठी प्रयत्न चालू केले. दुसरीकडे रवी नाईक यांनीही प्रयत्न चालविले होते. तिसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. दिली डिसोझा यांनीही सरकार बनविण्यासाठी चाचपणी चालू केली होती. या कामात काँग्रेस आमदार सुरेश परुळेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसने अल्पकाळासाठी रवी नाईक यांना काँग्रेसने पाठिंबा द्यावा व नंतर डॉ. विली मुख्यमंत्री बनतील असा प्रस्ताव परुळेकर यांनी विलीसमोर ठेवला.
डॉ. विली हे अत्यंत धूर्त तर रवी महाधूर्त. त्यामुळे कोणी प्रथम मुख्यमंत्री व्हावं या मुद्यावर बरीच घासाघीस झाली. अखेर डॉ. विली यांनी माघार घेतली आणि २५ जानेवारी १९९१ रोजी भंडारी समाजाचे स्वप्न साकार झाले. गोव्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या भंडारी समाजाचा लाडका नेता रवी नाईक गोव्याचा मुख्यमंत्री बनला होता. रवी नाईक मुख्यमंत्री बनल्याने तमाम गोमंतकीय आनंदी झाले होते. एक भाटकार वर्ग स़ोडला तर बाकी सगळे लोक विशेषतः कुळ मुंडकार, दीनदुबळे, दलित आदी सगळेच लोक खरोखरच खूश झाले होते. केवळ नाराज होते ते भाटकार! गोव्यातील बहुसंख्य आमदार हे भाटकारच होते व आजही आहेत. बहुतेक सरकारी अधिकारीही सधन श्रीमंत आहेत. कुळ कायदा व कसेल त्याची जमीन कायद्याला त्यांचा मनातून विरोध आहे. त्यांच्या मालकीची घरे आणि शेते, भाटे दुसऱ्याची झाली होती.
काही कुळे तर मूळ भाटकारांपेक्षा मोठे भाटकार बनले आहेत. माशेल येथील एका छोट्या भाटकारणीची ढाल करून गोव्यातील सगळे भाटकार सर्वोच्च न्यायालयात लढत होते. देशातील बडे बडे वकील भाटकारांच्यावतीने युक्तिवाद करत होते. कुळमुंडकारांच्या बाजूने कूळमुंडकार संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक हे एकटेच होते. १९७६ ते १९९० अशी १४ वर्षे हा खटला चालला होता. रवी भक्कमपणे कुळमुंडकाराबरोबर राहिले म्हणूनच विजयी झाले.
मुख्यमंत्री कसा असावा असा प्रश्न कोणी विचारला तर रवी नाईक यांच्यासारखा असे उत्तर मी देईन. मुक्तिनंतर अनेक मुख्यमंत्री गोव्यात होऊन गेले. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार काम केले. रवी एक असा मुख्यमंत्री होऊन गेला ज्यांनी कायदा, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि ज्यांच्या हाताखाली एका वर्षापूर्वी मंत्री म्हणून काम केले होते त्या चर्चिल आलेमाव यांना काफेपोसाखाली तुरुंगात डांबले. त्यांच्याजागी इतर कोणी मुख्यमंत्री असता तर कस्टमने पाठविलेल्या शिफारसीवर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी १० वेळा विचार केला असता. हीच गोष्ट सांताक्रूझ परिसरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या समाजसेविका व्हिक्टोरिया फर्नांडिस यांची होती. एका समाजसेवी संघटनेच्या नावाने चाललेली गुंडगिरी देशाच्या एका फटकऱ्याने मोडून काढण्याची किमया केवळ रवीच करु जाणे. दुर्जनांचे कर्दनकाळ आणि सज्जनांचे आधार असलेले लोकनेते रवी नाईक यांना सादर प्रणाम!
गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)