"एक्सक्युज मी! मी तुम्हाला ओळखलं नाही. आपल्याला कुठे तरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कुठे पाहिलंय हे मात्र नक्की आठवत नाही. तुम्ही कोण? कुठले? तुमचं नाव काय? तुम्ही कुठं राहता? तुम्ही..."
आश्विन शुद्ध चतुर्दशीची लख्ख रात्र उजाडली. रात्र कुठली? मध्यरात्रच ती! सगळं मडगाव शहर परतीच्या मुसळधार पावसात चिंब भिजलेलं. तरीही पावसाची रिपरिप तशी कमी झाली नव्हती. आता सर्वत्र सामसूम झाली होती. कोलवा सर्कलकडे रस्त्याच्या बाजूला शांतपणे पहुडलेल्या रविंद्र भवनाने डोळे किलकिले करून इकडेतिकडे बघितलं. आजूबाजूला कुणीही नव्हतं. त्यानं आळोखेपिळोखे दिले अन् अंग झाडून उभं राहून एक लांबलचक आसुरी जांभई देऊन आसमंत न्याहाळू लागलं. तेवढ्यात भरपावसात प्रचंड वीज कडाडली अन् एक अक्राळविक्राळ रूप धारण केलेला राक्षस भूतलावर अवतरला. त्याचा तो अवतार पाहून रविंद्र भवन थरथर कापू लागलं. त्याची दातखीळच बसली. तरीही धीर करून त्यानं एका दमात त्या असुराला विचारलं, "एक्सक्युज मी! मी तुम्हाला ओळखलं नाही. आपल्याला कुठे तरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कुठे पाहिलंय हे मात्र नक्की आठवत नाही. तुम्ही कोण? कुठले? तुमचं नाव काय? तुम्ही कुठं राहता? तुम्ही..."
त्याचं बोलणं मध्येच तोडत असूर जोरात खेकसला.
"ए शेंबड्या! आता गप्प बसतो का?"
रविंद्र भवन त्या भसाढ्या आवाजाने आणखीनच घाबरून गेलं.
"मी नरकासुर! माझ्या सेलिब्रेशनला आणखीन थोडेच दिवस उरलेत. मला असं काहीतरी करायचं आहे जेणेकरून माझी किर्ती वाढेलच पण पोरांनाही एक वेगळाच नाद लागेल. क्रिएटिव्हिटी वाढेल त्यांची, काय? मग मला सांग, तू यासाठी काय करायला तयार आहेस?
.....
ऐकतोस का ए?!
आं? हो! हो! नरकासुर दादा!
"माझे पुतळे करण्याची कार्यशाळा करायची आहे. तुला जमेल का? आठ दिवसांत कार्यशाळेची पोरं अजस्त्र नरकासुर तयार करायला शिकली पाहिजेत, नाहीतर तुझी खैर नाही."
ते ऐकून रविंद्र भवनाची बोबडी वळायचीच बाकी होती.
रविंद्र भवन आपल्या फिल्मी स्टाईलने त्याला मस्का लावायचा प्रयत्न करू लागलं.
"दादा! हॅ हॅ! तेऽऽ....!"
"ते काय ते?"
"ते आपलं.... फंड....???"
फंड देणार तर! पण एक मात्र, कार्यशाळा झाली पाहिजे.
हो! हो! म्हणजे काय? होणार म्हणजे होणार.!
बऽरं!
"आणि या वर्षी रात्री उशिरापर्यंत माझ्या उत्सवाला बंदी आहे म्हणे? कोणी घातली रे बंदी? कोण तो दीड शहाणा?"
" अंऽ तेऽ काय चालूच असतं. त्याचा तुम्ही लोड घेऊ नका."
"लोड घेऊ नका म्हणजे? लोड घेऊ नका कसं? माझा उत्सव आणि मी लोड घ्यायचा नाही? तेही बंदी घालत असूनही? काय बोलतोस तू? आं?"
" हॅ हॅ! तसं नाही, तसं नाही, तसा लोड घेऊ नका, असा लोड घ्या!"
" असा म्हणजे?"
"म्हणजे जरा फंडाचं ते...! म्हणजे पोरांना द्यायला फंड हवा ना?" त्याशिवाय पोरं नरकासुर करणार कशी?"
"अरे फंड मी तुला आत्ता देतो. ते रात्री उशिरापर्यंत बंदी घातली ती कोण उठवणार?"
" अहो साहेब! तुम्ही नरकासुर असून तुम्हाला ठाऊक नाही की असल्या बंद्या बिंद्या म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसायचा प्रकार असतं ते? हांऽ!!!
कसली बंदी घेऊन बसलात तुम्ही? तुमचं सेलिब्रेशन सकाळी कोंबडा आरवल्याशिवाय संपणार नाही याची खात्री मी देतो."
" हांऽ! बराय! सुटलास तू नव्हे, वाचलास. नाहीतर मी तुझ्या नाकाची नाकेबंदी करून तुला माझ्याबरोबर नरकात घेऊन गेलो असतो. चल येतो मी."
बरं सायब! ते फंडाचं!.....
देतो रे!
तू पोरांना कामाला लाव. मी स्वतः राजकारणी आहे अन् तु मला शिकवतो. अरे देवच माझ्या ताब्यात आहे. तर तुम्हा लोकांची काय कथा?
व्वा व्वा सायब! देवमाणूस आहात तुम्ही, देवमाणूस!
इतक्यात जोराचा वारा आला, वीज कडाडली अन् ढगांचा मोठ्ठा गडगडाट झाला.
रविंद्र भवन खडबडून जागं झालं. त्याने इकडेतिकडे बघितलं. बघ तर मोबाईलवर नोटिफिकेशन्स बोंबलत होती. त्याने मोबाईल ओपन करून सोशल मीडियावर नोटिफिकेशन्स चेक करायला सुरूवात केली.
पाहतो तर काय?
सगळेजण सोशल मीडियावर रविंद्र भवन, नरकासुर, नरकासुर करण्याची कार्यशाळा, कशाला हवा तो नरकासुर? वगैरे ओरडत सगळ्यांना शिव्या देत होते.
प्रा. विघ्नेश शिरगुरकर